एशियाडमधील खेळाडूला केरळच्या पुरात अडकलेल्या आजीची चिंता

0

जकार्ता :केरळमधील इद्दुकी जिल्हा सध्या पाण्याखाली आहे. सबंध केरळमध्ये पुराने हाहाकार माजला आहे. याच इद्दुकी जिल्ह्यात भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशची आजी, त्याच्या मामासह राहते. पुराचा फटका बसलेल्या गावातील आपले आजी, मामा कसे असतील, याची चिंत्ता सहाजिकच साजन प्रकाशला आहे. रविवारी त्याने एशियाडच्या २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीच्या फायनलमध्ये धडक मारली.

२४ वर्षांच्या साजनला केरळमधून पूर परिस्थितीची कल्पना अगदी शनिवारपर्यंत नव्हती. एशियाड तयारी आणि मग तिथे रवाना होण्याची गडबड यामुळे त्याच्या आईनेच ही बाब साजनपासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली होती. साजनची आजी, म्हणजेच त्याच्या आईच्या मातोश्री इद्दुकीला राहतात. साजनच्या मामाचे कुटुंब तिथे आहे. त्या जिल्ह्यातच परियार नदीवर डॅम आहे. हा डॅम वाहू लागल्याने त्याचे दरवाजे उघडण्यात आले ज्यामुळे इद्दुकी गावाला पाण्याने वेढले.

३२ वर्षांनंतर प्रथम एखाद्या भारतीयाने एशियाड जलतरणाच्या शर्यतीतील २०० मीटर बटरफ्लायच्या फायनलमध्ये धडक मारली. फायनलमध्ये साजन पाचव्या क्रमांकावर राहिला. आपली प्राथमिक फेरीतील ऐतिहासिक कामगिरी केरळमध्ये राहाणाऱ्या आपल्या आजीला समजली तरी असेल का? ती सध्या कशा स्थितीत असेल? असे प्रश्न सध्या साजनला पडले आहेत. १९८६मध्ये खझानसिंग यांनी एशियाडच्या २०० मीटर बटलफ्लाय शर्यतीच्या फायनलमध्ये धडक मारली होती.