पत्रकार गौरी लंकेश हत्याकांड; देशातील राजकारण तापले
बेंगळुरू/नवी दिल्ली : वरिष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश (55) यांची बेंगळुरू येथील राजराजेश्वरी नगर येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. डावी विचारसरणीच्या व हिंदुत्ववादी विचारसरणीवर आपल्या लेखनीद्वारे हल्लाबोल करण्यासाठी ख्यातकीर्त असलेल्या गौरी यांची हत्या ही डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याकांडातील एक कडी होती, असा आरोप विविधस्तरांतून होत आहे. गौरी घरी परत आल्यानंतर गेट उघड असताना दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात एक गोळी त्यांच्या छातीत तर एक कपाळावर लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडप्रकरणी केंद्र सरकारने कर्नाटक सरकारकडून अहवाल मागविला असून, राज्य सरकारने चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री रामालिंगा रेड्डी व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. पोलिस महानिरीक्षक या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. तसेच, गरज पडल्यास सीबीआय चौकशीही केली जाईल, असे सिद्धरमय्या म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही वेळप्रसंगी सीबीआय चौकशीचा निर्णय घेऊ असे सांगून, राज्याकडून त्वरित अहवाल मागविल्याचे सांगितले. या हत्येवरून काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. केंद्र देशातील वातावरण गढूळ करत आहे, असे काँग्रेस म्हणाली. तर देशावर विचारधारा थोपविली जात असून, आता जातीयवाद्यांची मानसिकता उघड पडली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल यांचे हे विधान निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या हत्येचा केंद्र निषेध करत आहे, असेही ते म्हणाले.
सर्वस्तरातून निषेधाचे सूर, न्यायिक चौकशीची मागणी
दी एडिटर्स गिल्डने वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. हिंदुत्ववादी विचारसरणीवर सडकूट टीका करणार्या गौरी त्यांची कन्नडपत्रिका गौरी लंकेश पत्रिकामधून तर सडेतोड लिखाण करतच होत्या, परंतु निर्भीडपणे इतर दैनिकांतूनही लिहित होत्या. गौरी यांच्या हत्येने एडिटर्स गिल्डला मोठा धक्का बसला आहे. लोकशाहीत सद्या अस्वस्थ असलेल्या लोकांसाठी ही हत्या अशुभ संकेत आहेत. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर हा क्रूरहल्ला आहे. कर्नाटक सरकारने या हत्याकांडाच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग गठीत करावा, अशी मागणीही एडिटर्स गिल्डने केली आहे. बॉलीवूडनेही या हत्याकांडाचा तीव्र निषेध केला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश; अशाप्रकारे एकापाठोपाठ एक हत्या होत असतील तर मग् मारेकरी कोण आहेत? असा सनाल गीतकार जावेद अख्तर यांनी ट्वीटरद्वारे केला. कवी कुमार विश्वास यांनीही या हत्येबद्दल शोक व्यक्त केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, देशाचे ‘दक्ष हिंदुत्व नेते‘ कुठे आहेत? सत्य कधीही दाबून ठेवता येणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची विचारधारा सत्य दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी डागले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्याशी चर्चा करून मारेकर्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, या घटनेचा निषेध करत आपण गौरी यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, असे सांगितले.
दाभोलकर, पानसरेंच्या हत्याकांडाशी साधर्म्य
या हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने कर्नाटक सरकारकडून अहवाल मागविला आहे. गौरी यांचे हत्याकांड हे कलबुर्गी, पानसरे, दाभोलकर यांच्या हत्याकांडासारखेच आहे. खुद्द मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कर्नाटक सीआयडीने एक अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपविला असून, गौरींची हत्या 7.65 एमएम पिस्टलने करण्यात आली आहे. पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्याही अशाच पिस्टलने करण्यात आलेल्या आहेत. या तिघांनाही अशाच प्रकारे जवळून गोळ्या घालण्यात आल्यात. गौरी या बाहेरून घरी आल्या होत्या. त्या गेट उघडत असतानाच त्यांच्या अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळ्या घातल्या. त्यांचा मृतदेह बराचवेळ पडून होता. हल्लेखोरांनी एकूण सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्यात. हल्लेखोर हे तिघेजण होते, असेही पोलिसांनी सांगितले.