एसआरएला विरोध करणार्‍यांना धमक्या

0

येरवडा । येरवडा भागातील जाधवनगर झोपडपट्टी भागातील रहिवाशांनी एसआरए योजनेस विरोध दर्शविल्याने गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांनी त्यांना धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व सामान्य जनतेमध्ये दहशत पसरविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ महिलांनी येरवडा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले.

जाधवनगर झोपडपट्टीत 40 ते 45 वर्षांपासून हे नागरिक राहत आहेत. अनेकांनी बँकांमधून कर्ज काढून घरांची बांधकामे केली आहेत. त्यातच काही प्रमाणात असलेली जागा ही पालिका उद्यान विभागाची असून काही खाजगी मालकीची आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने असलेल्या जागेत एसआरए ही योजना राबविणार असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना जाहिरातीद्वारे कळल्याने या योजनेस नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. पालिकेच्या वतीने परिसरातील नागरिकांना इतरत्र स्थलांतरीत करण्यात येणार असले तरी पण घरासाठी केलेला खर्च हा पाण्यात जाणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

धमक्यांमुळे रहिवासी भयभीत
नागरिकांचा या योजनेला विरोध असून जागा रिकामी करण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकाने या भागातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरून जागा खाली करण्यासाठी अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून हे प्रकार घडत असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी अखेर येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनीही कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते.

गुंडांवर कारवाईची मागणी
अखेर संतप्त झालेल्या नागरिकांसह 200ते 300 महिलांनी येरवडा पोलीस स्टेशनला घेराव घालून शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक सुनील टिंगरे, फरजाना शेख, विशाल साळवे, काका शिंदे, पापा सय्यद, बाबू पांचाळ, खंडू धुमाळ, सीमा शिंदे, दौलत मणियार, रजनी कबशींन, मैना वाघमारे आदींनी पोलिस निरीक्षक मुकुंद महाजन यांची भेट घेऊन गुंडांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस कोणतेच ठोस पाऊल उचलत नसल्याने गुंडांना देखील यामुळे मोकळे रान सापडले असल्याचा आरोप अनेकांनी केला. यादरम्यान महाजन यांनी पीडितांची बाजू समजून घेऊन गुंडांच्या विरोधात तक्रार देण्याचे आवाहन केले. याबरोबरच जाधवनगर भागात रोज दोन पोलिस कर्मचारी गस्तीवर ठेवण्यात आल्याची माहिती दिली. संबंधितावर योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन महाजन यांनी नागरिकांना देताच महिलांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

…तर योजना बंद करू
नागरिकांनी कायदा हातात ना घेता कोणी धमकी देत असतील तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. या योजनेस सर्व नागरिकांचा विरोध असेल तर जनतेच्या पाठीशी आपण उभे राहून ही योजना बंद करू, असे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.