मुख्यमंत्र्यांचा दणका : लोकायुक्तांमार्फत करणार चौकशी
मुंबई : मुंबईतील एम. पी. मिल कंपाऊंड येथील एसआरएप्रकरणी राज्यपालांनी लोकायुक्तांना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मेहता यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. एसआरए घोटाळ्याचे प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजले होते. विरोधकांनी या घोटाळ्यावरून विधानसभेत जोरदार हंगामा करत मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहतांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मेहता आमदार असल्याने लोकायुक्तांकडून चौकशी होण्याअगोदर राज्यपालांची संमती आवश्यक होती. मुख्यमंत्र्यांनी संमती देण्यासाठी राज्यपालांना विनंती केल्यानंतर राज्यपालांनी बुधवारी लोकायुक्तांना मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले.
काय आहे प्रकरण?
मुंबईमधील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कंपाऊंड येथील एसआरए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विकासकाला फायदा मिळवून देण्यासाठी मेहता यांनी नियमांचे उल्लंघन करत एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘3 के’च्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचे कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी विकासकांच्या प्रस्तावाला विरोध केला होता. तसेच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरे) संदर्भातील प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल असा शेरा मारला होता. मात्र मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचा शेरा मारला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून एका एसआरए प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची मान्यता असल्याचे नोटिंग लिहिल्याची जाहीर कबुली प्रकाश मेहता यांनी सभागृहात दिली होती, त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती.