एसएमएसद्वारे जोडा पॅन आणि आधार

0

मुंबई । प्राप्तिकर विभागाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी एसएमएस सुविधा तयार करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि नाव टाईप करून 567678 किंवा 56161 क्रमांकावर एसएमएस केल्यास काही वेळातच त्यांचे पॅन आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडले जाईल, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.

आधार क्रमांकासह नव्याने पॅन कार्ड
प्राप्तिकराशी निगडीत सुविधांचा लाभ घेण्यासाठी या दोन्ही क्रमांकांची नोंदणी आवश्यक असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. नव्या पॅन कार्डासाठी अर्ज करताना आधार क्रमांक नमूद केल्यास ते एकमेकांशी जोडले जातील. नागरिकांना आधार क्रमांकासह पॅन कार्ड नव्याने छापण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे.

संकेतस्थळावर दोन लिंक उपलब्ध
नागरिकांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनदेखील ही जोडणी करता येणार आहे. संकेतस्थळावर दोन लिंक उपलब्ध आहेत. पहिल्या लिंकवर क्लिक करून पॅन कार्डातील चुका दुरुस्त करण्यासाठी नव्या पॅन कार्डसाठीदेखील अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे, आधार कार्डावरील तपशीलात बदल करण्यासाठी दुसरी स्वतंत्र लिंक उपलब्ध आहे.

तर पॅन कार्ड रद्द केले जाणार
देशातील सर्व नागरिकांना येत्या 1 जुलैपर्यंत पॅन कार्ड म्हणजेच पर्मनंट अकाऊंट नंबर आपल्या आधार कार्डासोबत जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे न करणार्‍या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द केले जाणार असून ते कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी अपात्र असेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. प्राप्तिकर संकलन वाढवत करचुकवेगिरी करणार्‍या लोकांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.