पुणे । स्कूल स्पोर्टस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएसएफआय) संघातील जलतरणपटू सिद्धान्त खोपडे याने 69 व्या फिसेक गेम्समध्ये तीन रौप्यपदक मिळवले. भारताच्या फुटसाल संघाने देखील या स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले. इटालियन कॅथलिक स्कूल स्पोर्टस फेडरेशनच्या वतीने आयोजित ही स्पर्धा विनस या देशात पार पडली.
40 सदस्यांच्या पथकाचा सहभाग
इटालियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने आणि इंटरनॅशनल स्पोर्टस फेडरेशन फॉर कॅथलिक स्कूलच्या मान्यतेने ही स्पर्धा होते. व्हेनिसमधील लिग्नानो येथे 2 ते 8 जुलै दरम्यान ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत 40 सदस्यांचे पथक सहभागी झाले होते. यात भारतीय खेळाडूंचा व्हॉलीबॉल (मुली), फुटसाल (मुले), जलतरण (मुले) या खेळात सहभाग होता.
व्हॉलीबॉलमध्ये मुलीही चमकल्या
जलतरणपटू सिद्धान्त खोपडे याने 200 मीटर, 100 मीटर आणि 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळवले. फुटसाल संघानेही चमकदार कामगिरी करून ब्राँझपदक मिळवले. एफआयएसइसीच्या इतिहासात प्रथमच आशियाई देशाने या स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक गटात पदक मिळवले. व्हॉलीबॉलमध्ये मुलींच्या संघानेही चमकदार कामगिरी केली. यात एसएसएफआय भारतीय व्हॉलीबॉल संघाने पोतुर्गाल आणि स्पेनच्या संघाला पराभूत केले. यानंतर फ्लँडरर्स आणि यजमान इटलीकडून भारतीय मुलींना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.