जळगाव । डिजिटल अर्थव्यवस्था व कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या वित्तीय साक्षरता अभियानाची देशभरात चर्चा सुरु आहे. या अभियानात देशभरातील विभिन्न अशा 4,896 शिक्षण संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता ज्यात एस एस बी टी अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी, जळगावचे प्रदर्शन हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून उल्लेखनीय व अप्रतिम ठरले.
उत्कृष्ट विद्यार्थी व्हॉलंटियर म्हणून विद्यार्थ्यांचा सत्कार
या अभियाना अंतर्गत विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 8 मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय संमेलनासाठी महाविद्यालयातील अक्षय शेळके आणि वैभव महाजन या विद्यार्थ्यांची विशेष कामगिरी करण्याबाबत निवड करण्यात आली होती. तर या राष्ट्रीय संमेलनात त्यांना उत्कृष्ट विद्यार्थी व्हॉलंटियरचा सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान त्यांना केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती प्रसारण मंत्री श्री रवी शंकर प्रसाद यांनी प्रदान केला. ज्यात पुरस्कार स्वरूप आकाश टॅबलेट व प्रमाणपत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
प्राचार्यांनी केले मार्गदर्शन
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के एस वाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, विद्यार्थ्यांनी, कर्मचार्यांनी आणि शिक्षकांनी मिळून केलेल्या या अभियानाचे हे फळ आहे आणि सर्वांचे प्रदर्शन खरंच उल्लेखनीय आहे. यात विद्यार्थी कल्याण अधिकारी एन.एम.काझी, डॉ.व्ही.एस.राणा, डॉ.एस.आर.सुरळकर, डॉ. विजय ढिवरे आणि प्रा. कुणाल पांडे याच्यासह अक्षय शेळके, वैभव महाजन, सोनम महाजन, कल्पेश वाघ, राहुल पाटील सहकार्य लाभले.