जळगाव। विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याला चालना मिळावी व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जोपासावी यासाठी श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट यांचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी (एसएसबीटी) महाविद्यालयात जिल्ह्यातील पहिली आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) लॅब सुरु करण्यात आली. महाविद्यालयातील आयटी विभागात या लॅबचे उद्घाटन शनिवारी 10 रोजी करण्यात आले. आरोग्यदायी कचरा पेटी, ट्राफीक कंट्रोल युनिट, घरातील सर्व उपकरणे इत्यादी इंटरनेटद्वारे कसे हाताळावे याविषयी प्रात्यक्षीक दाखविण्यात आले.
अशा प्रकारची आधुनिक तंत्रज्ञान असलेली ही पहिलीच लॅब असल्याचे आयटी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.भदादे यांनी सांगितले. विभागातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे हाताळणी तंत्राची माहिती देण्यात आली. कुणाल वारुडकर, घनश्याम सोनार, चेतन पाटील, ईश्वर ठाकरे, मुस्तनशिर राणा आदी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य के.एस.वाणी, डॉ.एस.आर.सुरळकर, प्रा.कृष्णा श्रीवास्तव, प्रा.एन.पी.जगताप, डॉ.जी.के.पटनाईक, एस.एच.राजपूत, एस.जे.पाटील, अर्चना भावसार, आर.बी.सागोंरे आदी उपस्थित होते.