एसटीचा ” आधार ” १ लाख श्रमिकांना..!

0

मुंबई – एसटीने गेल्या सहा दिवसांत राज्याच्या विविध भागातील १ लाख ६ हजार २४ मजुरांना विविध राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पने पोहचविण्यात आल्याची माहिती एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दै. जनशक्ती ला दिली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो चालकांनी ७ हजार २२७ बसेसद्वारे पोहचविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या चालकांना एसटीच्या इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांबरोबर राज्य परिवहन विभागाचे देखील बहुमोल सहकार्य लाभले आहे.
यासाठी निश्चितच हे सर्व जण कौतुकास पात्र असल्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी काढले आहेत.

आज कोरोना महामारीच्या जागतिक संकटाला सामोरे जात असताना राज्य शासनाच्या निर्देशानुसार २३ मार्चपासून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यानां दळणवळणाची सेवा एसटी मार्फत पुरविण्यात येत आहेत. त्याचबरोबर ९ मे पासून एसटीच्या बसेस आपल्या गावी जाण्याच्या ओढीने भर उन्हा-तान्हात कुटुंबासमवेत पायपीट करणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी धावत आहेत. सहाजिकच या कार्यामुळे ” महाराष्ट्राची लोकवाहिनी ” ही बिरुदावली अभिमानाने मिरवणारी आपली लाडकी ” एसटी ” देशपातळीवर देखील गौरवास पात्र ठरली असल्याची भावना जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी सांगितली.