एसटीची स्लीपर कोच बससेवा होणार सुरू

0

पुणे । एसटी महामंडळाची येत्या 15 दिवसातं स्लीपर कोच सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाने खासगी- सार्वजनिक भागीदारीतून 150 बस घेतल्या आहेत. राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान ही सेवा असणार आहे. पुण्यातून गोवा, नागपूर, नांदेडसाठी ही बससेवा सुरू होईल. पहिल्या टप्प्यात पुण्यातून गोव्यासाठीची बससेवा चार दिवसांत सुरू होणार आहे. परिवहनमंत्री दिवाकरराव रावते यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.

पहिल्या टप्प्यात गर्दीच्या मार्गावर आणि प्रामुख्याने 700 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी बससेवा सुरू होईल. या बस वातानुकूल असून यामध्ये मोबाईल चार्जर, वाय-फाय आदी सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक राजकुमार पाटील यांनी दिली.राज्यातील प्रमुख मार्गांवर सध्या खासगी प्रवासी बस वाहतूकदारांची मक्तेदारी आहे. त्यातून निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटीने स्लीपर कोच सेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी 150 बस सार्वजनिक खासगी भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. प्रवाशांना आरामशीर आणि किफायतशीर दरात सेवा पुरविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगीतले.

या मार्गांवर सुरू होणार बससेवा
ऑनलाइन पद्धतीने तसेच एसटी महामंडळाच्या अधिकृत एजंटांकडे या बससेवेसाठी आरक्षण करता येईल. प्रामुख्याने या बस प्रवाशांसाठी रात्री उपलब्ध असणार आहेत राज्यात तसेच राज्याबाहेरील या मार्गावर ही सेवा सुरू होणार आहे. मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-बंगळूर, पुणे-नांदेड, पुणे-पणजी, नागपूर-हैदराबाद, पुणे-शहादा