एसटीचे अधिकारी ग्रामीण भागातील कर्मचार्‍यांच्या भेटीला

एसटी कर्मचार्‍यांची मनधरणी

नंदुरबार। गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप लांबल्याने प्रवाशांची जीवन वाहिनी लालपरी अर्थात एसटी बस थांबल्याने सर्वच दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे. वरिष्ठ स्तरावरील तोडगा निघेल तेव्हा निघेल. मात्र, सध्या कर्मचार्‍यांची मनधरणी करण्यासाठी एसटीचे अधिकारी ग्रामीण भागातील कर्मचार्‍यांच्या भेटीवर भर देत आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदींच्या माध्यमातून समन्वय साधून एसटी कर्मचार्‍यांची मनधरणी करण्यात येत आहे.

सविस्तर असे, जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर या चार हजारातील 1500 चालक, वाहक, यांत्रिकी व लिपिक वर्गीय कर्मचारी राज्यातील संपात सहभागी झाले आहेत. दोन महिने 18 दिवस संपावर असलेल्या सर्व कर्मचार्‍यांनी पूर्ववत कामावर येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे अधिकारी प्रत्येक गावात जाऊन सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि एसटीचे कर्मचारी यांच्यात समन्वय साधून एसटीची चाके पुन्हा धावण्यास मदत होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या समन्वय अभियानात आगार प्रमुख मनोज पवार यांच्यासोबत लेखाधिकारी सांगळे, सुरक्षा दक्षता अधिकारी विसपुते, वाहतूक निरीक्षक आर.जे. वळवी पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे फिरत आहेत.

बसेस लवकरच पूर्ववत सुरू होण्याचा आशावाद
गेल्या दोन दिवसात नंदुरबार तालुक्यातील आष्टे, नांदरखेडा, ठाणेपाडा, धानोरा, वाघाळे, वैंदाणे, खर्दे, लोय पिंपळोद, शेजवा, घोटाणे, नटावद, शनिमांडळ तसेच नवापूर तालुक्यातील खांडबारा आदी गावातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून एसटीतील चालक, वाहक यांना कामावर येण्या संदर्भात समन्वय साधण्यात येत आहे. प्रशासनातर्फे कर्मचार्‍यांवर केलेले निलंबन आणि बडतर्फीची कारवाई मागे घेण्याची भावनाही कर्मचारी वर्गाकडून व्यक्त होत आहे. लवकरच एसटी बसेस पूर्ववत सुरू होणार असल्याचा आशावाद मनोज पवार यांनी व्यक्त केला.

नंदुरबार आगारातून सध्या शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे मार्गावर एसटी बस सुरू आहेत. धुळ्यासाठी नंदुरबार-धुळे बस सकाळी 7 वाजता सोडण्यात येत आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार दर एका तासाला नंदुरबार-धुळे बस सोडण्याचे नियोजन सुरू आहे.
-मनोज पवार, आगार प्रमुख, नंदुरबार