आठ एकर जमीन भारतीय अजैविक स्ट्रेस संस्थानला; महामंडळाचा विरोध नाही?
बारामती । बारामतीतील एसटी महामंडळाचे बारामती एमआयडीसी हे दुसरे आगार आहे. या आगारात बाहेरून आलेल्या व बारामतीतून लांब पल्ल्याच्या जाणार्या गाड्या धावत असतात. या गाड्यांमध्ये सोलापूर, तुळजापूर, बीड, नगर, औरंगाबाद, बेळगाव यांचा असा समावेश आहे. येथील आगारासाठी राज्य सरकारने अठ्ठावीस एकर जमीन दिलेली आहे. बारामतीच्या मुख्य शहरातील आगारात जागा कमी असल्याकारणाने व गाड्या पार्किंगची गैरसोय होत असल्याकारणाने तसेच औद्योगिक परिसरातून नागरिकांची सोय व्हावी, या उद्देशाने या आगाराची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या आगाराची आठ एकर जमीन ही माळेगाव येथील भारतीय अजैविक स्ट्रेस संस्थान या कृषिविषयक संशोधन करणार्या राष्ट्रीय संस्थेस देण्यात आली आहे. यामुळे या आगाराचा उद्देशास सुरूंग लागलेला आहे.
संबंधित यंत्रणा गप्प का?
एसटी महामंडळाची अत्यंत मोक्याची व महत्त्वाची अशी आठ एकर जागा गेलेली असताना देखील एसटी महामंडळाच्या वरीष्ठ अधिकारी व संबंधित यंत्रणा गप्प का बसली आहे हेही महत्त्वाचे आहे. आपली हक्काची जागा व गरज असतानाची जागा दुसर्यास जात असताना कर्मचारी संघटना व एसटी महामंडळाने विरोध का केला नाही; हेही महत्त्वाचे आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू
बारामती एमआयडीसीतील या आगारासाठी अठ्ठावीस एकर जमीन देण्यात आली आहे. या जागेत आगाराचे विभागीय भांडार कार्यालय आहे. तसेच मुक्कामासाठी येणार्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरच्या बाजूस आगाराचे काम सुरू आहे. याच डेपोच्या शेजारी आठ एकर अत्यंत मोक्याची जागा भारतीय अजैविक स्ट्रेस संस्थान या संस्थेच्या अधिकारी व कर्मचारी वसाहती करता देण्यात आली आहे. व तेथे सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. यामुळे बारामती एमआयडीसी आगारास जागेची प्रचंड कमतरता जाणवत आहे. अपुर्या जागेत कशाबशा बस उभ्या केल्या जातात. परंतू ही जागा खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आरक्षित जागेतून दिल्याचे समजते आहे. एस.टी. आगाराची जागा काढून इतर संस्थेला दिलीच कशी याविषयी संबंधित यंत्रणा कोणतेही स्पष्टीकरण देण्यास तयार नाही. याबाबत अतिशय गोफनियता पाळली जात आहे.
जमीन पडीक असूनही…
माळेगाव खुर्द येथील भारतीय अजैविक स्ट्रेस संस्थान या संस्थेस दीडशे एकर जमीन आहे. येथील खूप जमीन पडीक स्वरूपात आहे. या ठिकाणी या संस्थेच्या अधिकारी व कर्मचार्यांना वसाहती उभा करणे सोयीचे असताना त्या बारामतीत का उभ्या केल्या जातात हे एक गौडबंगालच आहे. कारण माळेगाव खुर्दपासून 18 किमी अंतरावरती उभा करण्याचा हेतू स्पष्ट होत नाही. शालेय शिक्षणाच्या सुविधेसाठी माळेगाव परिसरातच अवघ्या तीन किमी अंतरात प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. मग एवढ्या दूरवरती नऊ कोटी रुपये खर्च करून अधिकारी व कर्मचारी वसाहत उभी केली जात आहे. याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ विद्याप्रतिष्ठानचे महत्त्व वाढावे हा एक उद्देश अशीही नागरिकांमध्ये चर्चा आहे कारण तसा कृषिसंशोधनाचा हेतू असताना संशोधक केंद्रापाशीच अभ्यासक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी राहणे सोयीचे ठरते हा सर्वसाधारणत: जागतिक संकेत असताना हा संकेत डावलून हे कारस्थान का रचले गेले. याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.