शिंदखेडा । दरवाढ, कामगार वेतनाचा मुद्दा पुढे करून एस.टी. महामंडळाने 18 टक्के दरवाढ केली. रेल्वे, खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत ही सर्वाधिक दरवाढ आहे. लक्झरी गाड्यांच्या बरोबरीने एस.टीचे दर गेल्याने एस.टी. आता गरिबांची राहिली नाही. दरवाढीमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता प्रवासी संख्येत घट होण्याची भीती आहे.तर आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. ला पुन्हा तोट्याच्या गर्तेत ढकलण्याची योजना सरकारनेच आखली असल्याची टीका केली जात आहे.
दरवाढीसाठी नेमली होती समिती
एस.टी. च्या राज्यातील प्रत्येक विभागाला दरवर्षी 40 ते 50 कोटींचा तोटा सहन करावा लागतो. आता डिझेल दरवाढ, कामगार वेतनवाढीमुळे एस.टी. ने 16 जूनपासून 18 टक्के दरवाढ केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. साहजिकच प्रवाशांचा ओढा खासगी वाहतूक व रेल्वे प्रवासाकडे वळत आहे. कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर भरमसाठ आहे. अन्य राज्यात टप्प्याला 80 पैसे किलोमीटर पडतो, तर तोच दर महाराष्ट्रात 1.21 पैसे आहे. एस.टी. ची किती दरवाढ करावी, यासाठी समिती नेमली होती. या समितीने कमीतकमी 10 टक्के दरवाढीची शिफारस केली होती. परंतु सरकारने सरसकट 18 टक्के दरवाढ करून प्रवाशांना झटका दिला आहे. साहजिकच भविष्यात धोकादायक खासगी प्रवासाकडे प्रवासी वळणार आहेत. यातून 10 ते 15 टक्के फटकाही एस.टी.ला सोसावा लागेल. 1999 मध्ये बसेसची संख्याही 18 हजार होती. लोकसंख्येचा विचार करता ती 25 हजार इतकी होणे गरजेचे होते. मात्र ती संख्या 17 हजार 500 एवढीच आहे. गेल्या चार वर्षात डिझेलचे दर ज्यावेळी वाढले त्यावेळी एस.टी. दरवाढ होत आली आहे. 2014 मध्ये जुलै व ऑगस्ट या महिन्यांत दोनवेळ दरवाढ झाली.