एसटीच्या दापोडी कार्यशाळेतील कामगार संपावर

0

पिंपरी-चिंचवड : दापोडी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मध्यवर्ती कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत काम करणार्‍या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा निषेध नोंदविण्यासाठी येथील कामगारांनी लाक्षणिक संपाची घोषणा केली आहे. या कार्यशाळेत ठिकठिकाणी भंगार गाड्या, जुने सामान तसेच टायर आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाणी साचून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. कार्यशाळेत सुमारे 170 कामगार काम करत असून, त्यातील 60 ते 70 कामगारांना डेंग्यूची लागण झाली आहे. तरीही एसटी प्रशासनाकडून हे भंगार साहित्य व कचर्‍याची विल्हेवाट लावली जात नाही. म्हणून कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

अधिकार्‍यांचीही मनमानी वाढली
कार्यशाळेत अधिकारीवर्गाची मनमानीदेखील वाढली आहे. कामगारांना पदनिहाय काम दिले जात नाही. कोणालाही कोणतेही काम दिले जाते. आठवडे सुटी असतानादेखील कामगाराला कामावर बोलावले जाते. कार्यशाळेतील कामगारांकडून न घडलेल्या चुकीमुळे एका कामगाराला निलंबित करण्यात आले आहे. त्याबाबत सर्व कामगारांनी प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. कामगाराला निलंबित केल्याच्या आदेशावर ज्या अधिकार्‍यांच्या सह्या आहेत; त्याच अधिकार्‍यांनी याबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे कामगारांचा संताप अनावर झाला आहे.

विविध मागण्यांसाठी संप
कार्यशाळेतील भंगार गाड्या, जुने सामान तसेच टायर यांची योग्य विल्हेवाट लावावी, निलंबित केलेल्या कामगाराला पुन्हा कामावर घ्यावे, कामगारांच्या आरोग्याबाबत योग्य उपाययोजना करावी, या सारख्या मागण्या घेऊन कामगारांनी गुरुवारी सकाळपासून लाक्षणिक संप पुकारला आहे. याबाबत दापोडी विभागीय कार्यशाळेच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता, अधिकार्‍यांनी बोलण्याचे टाळले आहे.