पुणे । राज्यपरिवहन महामंडळाने एसटी अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी विमा योजनेची संकल्पना तयार करून अपघात सहायता निधी योजना सुरू केली आहे. यामध्ये प्रवाशांकडून दर तिकिटामागे एक रुपया आकारला जातो. निधी प्रवासी जनतेचा असल्याने तोे अर्थिक उत्पन्नात जमा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचा विरोध असल्याचे महासंघाचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांंनी पत्रकाद्वारे सांगितले.
दरवर्षी अपघात निधी मोठ्या प्रमाणावर जमा होणार असून विमा योजनेकरिता प्रवाशांकडून पैसे वसूल करणे चुकीचे असून कौशल्याने व व्यापारी बुद्धीने प्रवाशांच्या माथी मारून हुशारी दाखवली आहे. हा निधी जनतेकडून स्वतंत्रपणे घेण्यात येत असल्याने स्वतंत्र वार्षिक जमाखर्च आणि ऑडिट तयार करून जनतेला दाखवावा अशी प्रवासी महासंघाची मागणी आहे.
दरम्यान मार्च, 2017 अखेर 148 कोटी रुपये जमा झाले असून 75 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. तसेच प्रशासनाने 160 कोटीचे वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे मूळ उद्दिष्टाप्रमाणे मोठी रक्कम जमा होईल हा निधी आर्थिक उत्पन्नात दाखविणे चुकीचे ठरणार असून प्रवासी महासंघाच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभरात दबाब निर्माण करू अशा इशारा महासंघाचे महासचिव प्र. वि. कुलकर्णी यांनी दिला आहे.