एसटी आगाराच्या कारभारामुळे बारामतीकरांचे हाल

0

बारामती । बारामती एसटी आगाराचा नियोजन व वेळापत्रकाचा गोंधळ काही संपता संपेना. यामुळे प्रवाशांची चांगलीच पंचायत झाली आहे. आगाराची शटलसेवा पूर्णत: कोसळलेली असून बारामती-पुणे ही विनावाहक विनाथांबा सेवाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, बारामती वालचंदनगर ही शटलसेवा दोन मार्गाने सुरू असते. पहिला मार्ग हा काटेवाडी, भवानीनगर, सणसर, जंक्शन असून या मार्गावर दररोज चार बस धावत असतात. या चार बसपैकी एक बस रद्द करून प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या हालात चांगलीच भर घातली आहे. या मार्गावर सहा महत्त्वाची विद्यालये असून या मार्गावर विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. एक बस रद्द करून आर्ध्या तासाला सेवा सुरू केली आहे. त्यामुळे एक तासभर विद्यार्थ्यांना व प्रवाशांना बसथांब्यावर विनाकारण ताटकळत थांबावे लागते. याबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलनेही केली आहेत. आंदोलनानंतर बस वाढवून पुन्हा आठवड्याने बंद करायची, असे धोरणच बारामती आगाराने अवलंबले आहे.

प्रवासीवर्गात संतापाचे वातावरण
याच मार्गावरील दुसरा मार्ग म्हणजे डोर्लेवाडी, झारगडवाडी, सोनगाव, तावशी, उध्दट, चिकली, कळंबमार्गे वालचंदनगरला जाता येते. या मार्गावर बारामती एसटी आगाराच्या तीन बस धावत असतात. यापैकी एक बस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे फारच नुकसान होत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर दुसरी कोणतीही दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही. या शटलसेवेशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने प्रवाशांना काय करावे हेच कळत नाही. अवघ्या दोन महिन्यापूर्वी डोर्लेवाडी येथे या गैरसोयीविरोधात अंदोलने करण्यात आली आहेत. पुन्हा आठवडाभर व्यवस्थित सुविधा दिल्यानंतर एक बस रद्द करण्यात आली. बारामती आगाराच्या या धरसोडी वृत्तीबद्दल प्रवासी संतप्त आहेत.

प्रवाशांच्या सहनशिलतेला अंत
असाच प्रकार भिगवण, निरा, जेजूरी व फलटण या मार्गावरही सुरू आहे. बारामती बसस्थानकावर फार मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच विद्यार्थी आणि कामगार मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. जवळपास हजार प्रवासी या बससेमधून प्रवास करीत असतात. महाराष्ट्रात उत्पन्नातदेखील तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. तरीही सोयीसुविधा देण्याबाबत चालढकल का केली जाते? याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जाते. नवीन बस या आगाराला क्वचितच उपलब्ध होत असतात. जुन्याच बसवरती आगाराचा डोलारा उभा आहे. ही सर्व वस्तूस्थिती असतानादेखील बारामती एस.टी. महामंडळ प्रवाशांच्या सहनशिलतेला अंत पहात आहेत.