एसटी कर्मचार्‍यांचे मारहाणी विरोधात आंदोलन

0

जळगाव । शुक्रवार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 11 वाजता एसटी कर्मचार्‍यांनी अचानक जळगांव बसस्थानकाचे मेन गेट बंद करून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. भिवंडीतील मुजोर रिक्षाचालकांच्या मारहाणीत आज एका निष्पाप एसटी कामगारांचा बळी गेला यास सर्वस्वी पोलीस खाते जबाबदार असल्याने सर्व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व जळगाव बस स्थानकाच्या आजूबाजूचे अतिक्रमण व रिक्षा थांबा बंद करण्याची सामूहिक मागणी करण्यात आली.

या प्रसंगी आगार व्यवस्थापक एस बी खडसे व आगार प्रमुख शुभांगी शिरसाठ यांनी आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांना समजविण्याचा प्रयत्न केला परंतु, कर्मचार्‍यांनी त्यांचे काही एक ऐकले नाही. यावेळी तात्काळ पोलीस हजर झाले. याप्रसंगी डीवायएसपी सचिन सांगळे यांनी कर्मचार्‍यांची समजूत घातली व अवैध वाहतूक व अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी मृत एसटी कर्मचार्‍याला न्याय मिळावा म्हणून जळगांव बस स्थानकावर प्रचंड घोषणा देऊन निषेध करण्यात आला.

पोलिसांची दादागिरी बंद करण्याची मागणी

मोटारवाहन कायद्यानुसार सार्वजनीक वाहतुक करणार्‍या एसटी महामंडळाच्या आवारापासून खाजगी वाहनांना 200 मीटर पर्यत परवानगी नसतांना रा.प. आवारात खाजगी वाहने सर्रास उभी असतात त्यावर निर्बध न घालता त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलिसांना व एसटीमहामंडळाला या गोष्टीशी काहीही घेणदेण नसल्यामुळे यात चालक प्रभाकर गायकवाड याचा बळी गेला असल्याचा आरोप एसटीकर्मचार्‍यांनी यावेळी केला. अवैध वाहतूकदार व पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच भिवंडीच्या एसटी चालकाच्या मृत्यु झालेला असून या घटनेस पोलीस प्रशासन जबाबदार असुन त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहीजे, जिल्हापेठ समोरील मार्गाचे विस्तारीकरण करून या मार्गाची एसटी वाहतूक सुरु ठेवावी, पोलिसांची दादागिरी बंद करावी , बसस्थानकचे अतिक्रमण काढून व उंच गतिरोधक काढले पाहिजेत आदी मागण्या केल्या. या प्रसंगी इंटकचे नरेंद्रसिंग राजपूत , कामगार सेनेचे संजय सूर्यवंशी , कामगार संघटनेचे सुरेश चांगरे, , कास्टराईब संघटनेचे सुरेश तायडे , सेना अ‍ॅक्शन टीमचे गोपाळ पाटील , राकेश वाघ, दिनेश महाशब्दे, ललित गायकवाड, विनोद पाटील, संदीप सूर्यवंशी, आर के पाटील, सह सर्व पदाधिकार्‍यांनी शांततेचे आवाहन केलेे

प्रवाशांचा आंदोलनामुळे खोळंबा

सकाळी 11 वाजता सुरु केलेले आंदोलन दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु होते. यामुळे या वेळातील जळगाव डेपोच्या सुमारे 100 फेर्‍या विस्कळीत झाल्यात. दोन तासात जळगाव डेपोसह बाहेरुन आलेल्या अश्य सुमारे 200 बससे खोळंबून राहील्या होत्या. शाळा, महाविदयालयीन विध्यार्थ्यांसह सुमारे 3 ते 4 हजार प्रवासी आंदोलनामुळे खोळंबून पडले होते. जळगाव तालुक्यातील आव्हाणे, असोदा, कानळदा, भोकर, ममुराबाद येथील या वेळातील अनेक फेर्‍या रद्द कराव्या लागल्यात.

मुख्य गेटवर ठिय्या आंदोलन

मुख्य गेटवर ठीय्या आंदोलन करीत जळगाव बस्थानकाच्या बोहर असलेले रिक्षा थांबे तसेच खासगी वाहतुक करणारी वाहने नियमानुसार बसस्थानकाच्या 200 मीटर लांब उभे राहण्याची अमंलबजावणी करण्याची मागणी वाहक व चालकांनी केली. तसेच अमंलबजावणी न करणार्‍या पोलिस प्रशासनाचा देखील कर्मचार्‍यांनी निषेध व्यक्त केला. जळगाव स्थानकावरुन बसेस नेतांना या रिक्षाचालकांची अडचण होत असते अनेकवेळा मागणी करुनही पोलिस दखल घेत नसल्याने संताप व्यक्त केला.