दापोडी : उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या निकालाचा दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतील कर्मचार्यांनी निषेध केला. तसेच महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्यावतीने गुरुवारी (दि. 5) निदर्शने करण्यात आली. इतर राज्यांच्या राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत एसटी कर्मचार्यांना वेतन कमी दिले जाते. याबाबत उच्च न्यायालयाने कर्मचार्यांच्या वेतनाबाबत उच्चस्तरिय समितीची स्थापना केली आहे. या समितीने दिलेल्या शिफारशी व अहवालानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना अपेक्षेपेक्षा कमी वेतनवाढ सुचविली आहे. दुपारी जेवणाच्या वेळेत मध्यवर्ती कार्यशाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्मचार्यांनी हा निषेध नोंदवला. या समितीने सादर केलेला अहवाल अन्यायकारक असून, कामगारांना योग्य वेतनवाढ द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.