एसटी कर्मचार्‍यांच्या संपास प्रदेश प्रवासी महासंघाचा पाठिंबा

नंदुरबार। सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गियांची जीवनवाहिनी ठरलेल्या ‘लालपरी’ अर्थात एसटीची चाके थांबल्यामुळे प्रवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, कामगारांच्या मागण्या रास्त आहे. त्यास महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ नंदुरबार शाखेतर्फे जाहीर पाठिंबा दिला आहे. नंदुरबार आगारात उपोषणस्थळी तसेच राज्याचे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, धुळे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ, नंदुरबार आगाराचे प्रमुख मनोज पवार यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनस्थळी महिला वाहकांना पाठिंबा पत्र देतांना प्रवासी महासंघाच्या सदस्या प्रा. गीता जाधव, पूनम भावसार, सुरेश जैन, अ‍ॅड. निलेश देसाई, महादू हिरणवाळे, योगेश्वर जळगावकर, डॉ. गणेश ढोले, दर्शन ठक्कर, रघुनाथ अहिरे आदी उपस्थित होते.

शासनासह राज्य परिवहन महामंडळ आणि परिवहन खात्याने राज्यातील एसटी महामंडळात अनावश्यक कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी थांबवावी. प्रत्येक प्रवाशांकडून अपघात सहायता निधी अंतर्गत प्रत्येक तिकिटावर एक रुपयाप्रमाणे निधी वसूल करण्यात येतो. याद्वारे दुर्दैवाने एसटीला अपघात होऊन प्रवाशाचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांचा निधी देण्याची तरतूद आहे. याबाबत लाखो प्रवाशांकडून दररोज वसूल होणार्‍या निधीबाबत सांशकता आहे. निधी कुठे जमा होतो याची माहिती प्रवाशांना पर्यायाने जनतेला मिळणे गरजेचे आहे. यात पारदर्शकता असावी. राज्यातील सर्व बसस्थानके, आगार, कार्यशाळा, विभागीय कार्यालय यांच्या इमारती व जागांचे बाजारभावाप्रमाणे ऑडिट करून होणारी किंमत जाहीर करण्याचे धाडस शासनाने दाखवावे. तसेच खासगीकरणाच्या घाटामुळे एसटी डबघाईस आली आहे. त्यातून ग्रामीण भागातील प्रवासी सेवा ठप्प होणार आहे.

कर्मचार्‍यांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या
अत्यंत अल्प वेतनावर काम करणार्‍या आणि हजारो प्रवाशांच्या जीवाची काळजी घेणारे चालक-वाहक व कर्मचारी यांच्यावर करण्यात येणारी निलंबनाची कारवाईही मागे घेण्यात यावी. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात अर्थात ‘गाव तेथे एसटी’ व ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य घेऊन अविरत सेवा देणार्‍या एसटीला पूर्ववत गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, संघटक योगेश्वर जळगावकर यांच्यासह सदस्यांनी केली आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रवासी महासंघाचे नंदुरबारचे उपाध्यक्ष अ‍ॅड.निलेश देसाई, डॉ.गणेश ढोले, सचिव अशोक यादबोले, सहसचिव गोपाल लगडे, महिला सदस्य पूनम भावसार, प्रा.गिता जाधव तसेच सदस्य दर्शन ठक्कर, सुरेश जैन, नितीन पाटील, रघुनाथ अहिरे, वैभव करवंदकर, प्रसाद अर्थेकर, कमलाकर मोहिते, भरत माळी आदी उपस्थित होते.