एसटी कर्मचाऱ्यांकडून केरळ पुरग्रस्तांना 10 कोटी रुपयांची मदत

0
मंत्री दिवाकर रावते आणि कर्मचाऱ्यांकडून धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द
मुंबई : केरळ येथील पुरग्रस्तांना मदतीसाठी एसटीचे कर्मचारी तसेच महामंडळ पुढे सरसावले आहे. पुरग्रस्तांना मदतीसाठी एसटी कर्मचारी तसेच महामंडळाच्या वतीने 10 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी आज या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.
मंत्री रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी मंत्रालयात एसटीच्या मान्यताप्राप्त तसेच इतर कामगार संघटनांसमवेत बैठक झाली. त्यात केरळ येथील पुरग्रस्तांना कामगारांमार्फत मदत करण्याबाबत चर्चा झाली. सर्व कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पुरग्रस्तांना मदतीसाठी देण्याची तयारी दर्शविली. पण कर्मचाऱ्यांच्या वेतनातून फक्त अर्ध्या दिवसाचे वेतन देण्यात यावे आणि त्यात तेवढीच रक्कम एसटी प्रशासनामार्फत देण्यात यावी, अशी सूचना मंत्री श्री. रावते यांनी केली. त्यानुसार मदतीचा 10 कोटी रुपयांचा धनादेश दुपारी मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी मंत्री रावते यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल, एसटी कर्मचारी रामदास पवार, योगेश मुसळे, नितीन गदमळे, आप्पा वरपे, कमलाकर साळवे, संदीप कातकर यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री रावते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी तसेच एसटी महामंडळाने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची नेहमीच भूमिका घेतली आहे. यापुर्वीही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी एसटी कर्मचारी आणि महामंडळ पुढे सरसावले होते. आता केरळ राज्यावर मोठे संकट कोसळले असून तेथील नागरीकांना मदतीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वत;हून तयारी दर्शविली. कर्मचाऱ्यांची ही भूमिका मानवतेची तसेच इतर सर्वांसाठी आदर्शवत अशी आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीत एसटी महामंडळामार्फतही तेवढेच योगदान देऊन हा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.