एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप;प्रवाशांचे हाल

0

मुंबई-पगारवाढीच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील काही डोपोंमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. काही कामगार संघटनांनी हा अघोषित संप पुकारला आहे. कोणत्याही पूर्वकल्पना न दिल्याने भंडारा, सांगली या भागातील नागरिकांचा खोळंबा झाला असून सकाळी ७ वाजल्यापासून येथील एसटी स्थानकांतून एकही एसटी सुटलेली नाही.

संपाला उत्स्फुर्त प्रतिसाद

हा कुठल्याही अधिकृत संघटनेने पुकारलेला संप नसून कर्मचाऱ्यांनी तो उत्स्फुर्तपणे पुकारला आहे. भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथे मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे येथील स्थानकांत बसेस उभ्या आहेत. राज्यातील अनेक भागात एसटी सेवा सुरळीत सुरु असली तरी काही संघटनांच्या दाव्यानुसार या संपाला उत्स्फुर्त प्रतिसाद असल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाईलवरील संदेशांमार्फत आणि पत्रकांमार्फत या संपाची माहिती पसरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत.

पगारवाढ  मान्य नाही

परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांची मान्य नाही. हंगामी कर्मचारी म्हणून २५ टक्के पगारवाढ द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच ही पगारवाढीची मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात शिवशाही, शिवनेरी या बसेस वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेस बंद आहेत. ओरंगाबादचे मध्यवर्ती बस स्थानक, पुण्यातील शिवाजीनगर, भंडारा बस स्थानक, सांगलीच्या बसस्थानकांत बसेस आगारात उभ्या आहेत.