जळगाव । सर्वसामान्यांना या महागाईत देखील खिशाला परवडेल अशा दरात प्रवास एसटी महामंडाळाच्या बसने करता येत होता. परंतु, शुक्रवार मध्यरात्रीपासून एसटी बसचा प्रवास महागला असून नवीन दर लागू झाले आहेत़. डिझेलचे वाढलेले दर आणि एसटी कामगारांना नुकतीच देण्यात आलेली पगारवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य प्रवाश्यांना बसत आहे. एसटीच्या तिकीटदरांमध्ये तब्बल 18 टक्के वाढ करण्यात आली आहे. या नवीन दरामुळे साध्या बसेससह शिवनेरी गाड्यांनाही ही दरवाढ लागू झाली आहे.
प्रवाशांना भुर्दंड
एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बेताची असतांना पेट्रोल, डिझलच्या किंमती वाढल्यामुळे एसटी पुन्हा आर्थिक संकटात सापडली आहे. त्यातच कर्मचार्यांनी केलेल्या संपांची दखल घेऊन सरकारने कर्मचार्यांना वेतन वाढ जाहीर केली़ त्यामुळे कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले मात्र एसटीचा बजेट कोलमडला. परिणामी एसटीच्या भाडे वाढीचा निर्णय महामंडळाने घेतल्यामुळे प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे प्रवाश्यांकडून सांगण्यात आले़ राज्य परिवहन विभागाच्या बसेसच्या तिकीट दरातील वाढ 5 रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. ते टाळण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल.