एसटी भरतीत वशीलेबाजीला नो एन्ट्री!

0

मुंबई :- परिवहन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या एसटी वाहक व चालक पदाच्या परीक्षेत पारदर्शकता ठेवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. भरतीमध्ये वशिलेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. येत्या 2 जुलै रोजी होणाऱ्या एसटीच्या चालक तथा वाहक पदाच्या लेखी परीक्षेत व त्यानंतरच्या भरतीप्रक्रियेत माझ्यासह कोणाचाही वशीला चालणार नाही उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आथिॆक देवाण-घेवाणीमध्ये अडकू नये, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले आहे.

रावते पुढे म्हणाले की, ही भरतीप्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार असून लेखी परीक्षेनंतर होणारी चालकत्वाची (वाहन चालन चाचणी) चाचणी संगणकीय व मानवहस्तक्षेपरहित असणार आहे. तरी उमेदवारांनी कोणत्याही भुल-थापांना बळी न पडता प्रमाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दयावी असे आवाहन रावते यांनी केले आहे.

कोकणातील 7929 इतक्या चालक तथा वाहक पदासाठी 2 जुलैला लेखी परीक्षा होत आहे.या परीक्षेसाठी 28314 उमेदवार पात्र झाले असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध 27 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून उमेदवारांना परीक्षा झाल्यानंतर स्वत:च्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत सोबत घेऊन जाता येईल. तरी उमेदवारांनी कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या अमिषाला बळी न पडता निॆभिड व मोकळ्या वातावरणात परीक्षा दयावी असे एसटी महामंडळामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

भर्ती पारदर्शक व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या भरतीमध्ये वशीलेबाजीवर आळा घालण्याचा आमचा मुख्य प्रयत्न आहे. या प्रक्रियेत अशा प्रकारचे कृत्य आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल.
– दिवाकर रावते,परिवहन मंत्री