मुंबई । एसटी महामंडळाने शिवशाही श्रेणीतील 30 बर्थ (2 बाय 1) असलेली शयनयान (स्लीपर कोच) बस सेवा किफायतशीर तिकीट दरात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिल्या दहा खासगी भाडे तत्त्वावर असलेल्या बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. राज्यातील पाच मार्गांवर या बस धावणार आहेत. यामध्ये शहादा – पुणे ही स्लीपर कोच सेवा आजपासून सुरू होत आहे. यात चालक ठेकेदाराचा, तर वाहक एसटी महामंडळाचा राहणार आहे. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेने भाडंही किफायतशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
खासगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप
दरम्यान, ठेकेदाराचा ड्रायव्हर या बसवर असल्याने अप्रत्यक्ष एसटीत खासगीकरणाचा घाट घालण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा सवाल एसटी वर्तुळातून उपस्थित होत आहे. मध्यंतरी राज्यात काही ठिकाणी ठेकेदारी तत्त्वावर सुरू झालेल्या बसचालकाचा प्रवाशांना आलेला कटू अनुभव पाहता यात काय सुधारणा करण्यात आली, हे मात्र एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
स्लीपर कोचमध्ये मिळणार्या सुविधा
पूर्णतः वातानुकूलित, मोफत वायफाय, प्रत्येकाला ब्लँकेट-पिलो, मोबाइल चार्जिंगची सुविधा, आगप्रतिबंधक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीआरएस सिस्टिम.
शिवशाही स्लीपर कोच मार्ग आणि भाडे
मुंबई-पणजी (1296 रुपये)
पुणे-पणजी (959 रुपये)
औरंगाबाद-पणजी (1417 रुपये)
शहादा-पुणे (945 रुपये)
निगडी (पुणे)-बेळगाव (रु.797)