दापोडी । एसटीच्या वर्कशॉपमध्ये चार वर्षापासून भंगार टायरची साठवणूक करण्यात आली आहे. याची नियमित विल्हेवाट न लावल्याने या टायरमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी येथील 15 कर्मचार्यांना डेंग्युची लागण झाली आहे. विभागीय कार्यशाळेतील अधिकार्यांच्या दुर्लक्षतेमुळे व ढिसाळ कारभारामुळे येथील कर्मचार्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचा आरोप एस.टी.कामगार संघटनेने केला आहे.
आठ एकर जागेतील प्रशस्त अशा दापोडी एस.टी.वर्कशॉपमधील विभागीय कार्यशाळेची प्रशासन अधिकार्यांच्या दुर्लक्षतेमुळे अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. या कार्यशाळेत 130 कर्मचारी आहेत. येथील प्रशस्त जागेत एस.टी.चे भंगार जमा केले जाते. त्यामध्ये टायरचा ही समावेश आहे. या टायरची नियमीत विल्हेवाट लावली जात नसल्याने मागील चार वर्षापासून या कार्यशाळेत टायर रुपी भंगारचा मोठ्या प्रमाणात साठा निर्माण झाला आहे. यामध्ये पावसाचे पाणी साचून त्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास झाल्याने 15 कर्मचार्यांना डेंग्यूची लागण झाली आहे.
सर्वत्र घाणीचे साम्राज्य
येथील 130 कर्मचार्यांकरीता फक्त एकच स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. येथील 8 एकर जागेवरील कार्यशाळेकरीता केवळ एकच सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. सदर सफाई कर्मचार्यांकडून साफसफाईची कामे करून घेण्याऐवजी बस धुण्यासारखी इतर कामे करून घेतली जातात. त्यामुळे परिसारात प्रचंड प्रमाणात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
गणवेश वाटप रखडले
विभागीय कार्यशाळेत पाण्याचीही व्यवस्थित सोय नसल्याने कर्मचार्यांची गैरसोय होते. त्यांना कँटीनमधून पाणी विकत घ्यावे लागते. मागील चार वर्षांपासून कर्मचार्यांना गणवेशाचेही वाटप करण्यात आले नाही. कर्मचार्यांना स्वखर्चाने त्याची खरेदी करावी लागत आहे. कर्मचार्यांना प्रवासभत्ताही दिला जात नाही. साप्ताहीक सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाच्या मोबदल्यात ओव्हर टाईम मोबदला तसेच एक सुट्टी देणे बंधनकारक आहे. परंतु प्रशासनाच्या वतिने केवळ एक सुट्टी दिली जाते. विभागिय प्रशासन अशा प्रकारे कर्मचार्यांना वेठीस धरीत आहे. कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टिका संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकार्यांनी बोलणे टाळले
या प्रकरणी संघटनेच्या वतिने महामंडळ व स्थानिक विभागीय प्रशासनास अनेक वेळा वारंवार लेखी तक्रारी व निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, त्या संदर्भात अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत संघटनेने रोष व्यक्त केला आहे. प्रशासन व महामंडळाच्या ढिसाळ कारभाराविरोधात संघटनेच्या वतिने अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. परंतु तोडगा मात्र निघाला नाही. विभागीय कार्यशाळेतील वरिष्ठ अधिकार्यांशी या प्रकरणी संपर्क साधला असता त्यांनी बोलणे टाळले.
डासांचा प्रादुर्भाव
स्वच्छतागृह नियमितरित्या स्वच्छ केले जात नसल्याने तसेच परिसरात ही नियमितरित्या साफसफाई केली जात नसल्याने सर्वत्र घाण साचली आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या रोगराई, आजारांचा सामना कर्मचार्यांना करावा लागत आहे. एकंदरीत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कर्मचार्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे यावेळी संघटना प्रतिनिधींनी सांगितले.