जव्हार – एसटी स्थानकाला लागून सध्या फेरीवाल्यांनी विळखा घातलेला आहे. एसटी स्थानकाच्या भिंतीला लागूनच दुकाने थाटून विक्रेते बसले आहेत. यामुळे येथे नेहमी वाहतूक कोंडी होत असते. या अतिक्रमणामुळे या परिसरात पादचार्यांना चालणे तसेच बस चालकांना ही बस चालवताना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
या समस्येकडे नगरपरिषद साफ कानाडोळा करतांना दिसत आहे. ठाणे, पालघर, नाशिक, सेलवास, डहाणू, पुणे, कल्याण या ठिकाणांहून जव्हारला बसेस येत असतात आणि त्या एकमेव एसटी स्टॅन्ड रोडचा वापर करीत असतात.
कारवाई करूनही परीस्थिती सारखीच
या सार्वजनिक रस्त्यावर, फळ, ज्युस, भेळपुरी विक्रते, यांनी दुकाने थाटले आहेत. मागील वर्षीच जव्हार नगरपरिषदेने जिमखाना हॉलची भिंत मागे करून समोरील हातगाड्यांना जागा करून दिली होती. मात्र तरी हातगाडी मागे करून विक्रते आपल्या पेट्या पुढे ठेवीत असल्याने, तसेच एसटी स्टॅन्ड समोरील गाळ्यांनाही आरक्षित मैदानाची जागा देऊन गाळे मागे घेतले तरी देखील परिस्थिती जैसे थे च असल्याचे येथील नागरिक सांगतात. का नगरपरिषदेने हातगाड्यांची तसेच दुकाने यांची इतरत्र सोय करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.