नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात केली आहे. आतापर्यंत 1 कोटी आणि त्यापेक्षा कमी पैसे जमा असलेल्या बचतखात्यांवर एसबीआय 4 टक्के व्याज देत होती. आता 3.5 टक्के व्याज देण्यात येईल. बँकेची 90 टक्क्यांहून अधिक बचत खाती 1 कोटीपेक्षा कमी पैसे जमा असणारी आहेत.
बँकेच्या शेअरमध्ये वाढ
सोमवारी बँकेने या नव्या व्याजआकारणीची माहिती स्टॉक एक्स्चेंजला दिली. या व्याज दरकपातीमुळे बँकेच्या नफ्यात वाढ होणार आहे. बँकेने व्याजदर कपातीच्या केलेल्या घोषणेनंतर स्टेट बँकेच्या शेअरमध्ये 5 टक्के वाढून तो 312.65 रुपयांवर पोहोचला. महागाईच्या दरात झालेली घट आणि रिअल इस्टेटचे वाढलेले दर ही या व्याजकपातीमागची प्रमुख कारणे आहेत, असे बँकेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा बदल तत्काळ लागू होणार आहे. 1 कोटी रुपयांवरील जमा असणार्या खात्यांसाठी नवी दुहेरी बचत खाते कर पद्धतदेखील स्टेट बँक आणणार आहे. या खात्यांसाठी आधीप्रमाणेच 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.