मुंबई । जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये खाते असेल आणि एक जूनपासून एटीएममधील प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये शुल्क लागणार अशी चिंता तुम्हाला वाटत असेल तर अगदी निश्चिंत व्हा. कारण एटीएममधील व्यवहारांवर शुल्क आकारणार नसल्याचे स्पष्टीकरण एसबीआयकडून देण्यात आलेले आहे. 1 जूनपासून एटीएममधील प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये आकारण्यात येणार असल्याचे वृत्त खोटे असल्याचे एसबीआयने म्हटले आहे.
सामान्य बचत खातेधारकांनी एटीएममधून पैसे काढल्यास त्यासाठी आधीसारखेच शुल्क आकारले जाईल. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. एसबीआयने एक माहितीपत्रक काढून याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. सर्व बचत खातेधारक आधीसारखेच एटीएममधून 8 व्यवहार मोफत करू शकतात. यातील 5 व्यवहार एसबीआयच्या एटीएममधून, तर 3 व्यवहार अन्य बँकांच्या एटीएममधून करता येतील. निमशहरी भागात एटीएममधून 10 व्यवहार मोफत करता येऊ शकतात. एटीएममधून 4 वेळा पैसे काढण्याची मर्यादा फक्त बँकेच्या मोठ्या ग्राहकांसाठी असेल, सामान्य बचत खातेधारकांसाठी तशी कोणतीही मर्यादा नसेल, असे एसबीआयने माहितीपत्रातून स्पष्ट केले आहे.
बँकेच्या मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढण्याची नवी सुविधा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सुरू करण्यात येणार आहे. मात्र मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारामागे 25 रुपये शुल्क आकारण्यात येईल. खातेधारकाकडे असलेल्या एसबीआयच्या बडी अॅपमध्ये पैसे असतील, तर खातेधारक ते पैसे एटीएममधून काढू शकतो. यासोबतच खातेधारक आता मोबाईल वॉलेट किंवा मोबाईल वॉलेटमधील बिझनेस करस्पॉन्डंटच्या माध्यमातूनदेखील बँक खात्यात पैसे जमा करू शकतात. याआधी ही सेवा उपलब्ध नव्हती, अशी माहिती असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी दिली आहे. मोबाईल वॉलेटमधील बिझनेस करस्पॉन्डंटच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यात येणार्या दर हजार रुपयांवर 0.25 टक्के सेवा शुल्क द्यावे लागणार आहे. यासोबतच यावर सेवा करदेखील आकारला जाईल. ही रक्कम किमान 2 ते कमाल 8 रुपये इतकी असेल.