एससी-एसटी घटकांचा पाठबळ मिळविण्यात अपयश; शरद पवारांची कबुली !

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जो तो पक्ष यश अपयशाच्या बाबतीत चिंतन करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत अधिक जागा मिळाल्या आहेत, परंतु तरीही सत्ता स्थापनेपासून पक्ष दूर राहिला आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षनेत्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवावर चिंतन करत पराभवामागील कारणावर चर्चा केली.

अनुसूचित जाती-जमाती घटकांचा पाठबळ मिळविण्यात राष्ट्रवादी पक्ष अपयशी ठरल्याची कबुली शरद पवारांनी दिली. यापुढे या घटकाचा विश्वास संपदान करण्यासाठी पक्ष संघटनेने काम करावे असे आवाहनही त्यांनी पक्ष नेत्यांना केले. अनुसूचित जाती-जमातीतील मतदार हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा मतदार होता, परंतु मागील काही वर्षांपासून हा घटक पक्षांपासून दूर चालला आहे, याचे कारण शोधण्याची गरज असल्याचे शरद पवारांनी सांगितले.

नागरी भागातील प्रश्न मांडण्यात राष्ट्रवादी पक्ष कमी पडला आहे. कारण नागरी भागात राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्या आहेत, आगामी काळात नागरी भागातील प्रश्न समजून घेत त्याचा पाठपुरावा करण्याबाबत सूचना शरद पवारांनी दिल्या.