एसीसीएसफ विजयाचे प्रतिक : राष्ट्रपती

0

अहमदनगर : एसीसीएसला गौरवशाली परंपरा आहे. हे केंद्र 1948 सालापासून देशसेवेसाठी जवानांना प्रशिक्षण देत आहे. हे प्रशिक्षण केंद्र हे विजयाचे प्रतिक असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अहमदनगर येथील आर्मड कॉर्पस् सेंटर अ‍ॅण्ड स्कूलला निशाण प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती बोलत होते. हा कार्यक्रम सैनिक प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी जवानांनी राष्ट्रपतींना मानवंदना दिली.

उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींकडून निशाण देऊन केंद्राला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी डाक विभागाच्या फर्स्ट डे कवरचेही अनावरण करण्यात आले. राष्ट्रपतींसमोर जवानांनी नेत्रदिपक पथसंचलन केले. तसेच लष्कराच्या सुखोई विमानांनी आणि हेलिकॉप्टरने चित्तथरारक हवाई कसरतीने सर्वांचे लक्ष वेधले. अर्जुन, भिष्मा, टँकसह इतर रणगाड्यांचाही यामध्ये सहभाग होता. ध्वजप्रदानाच्या कार्यक्रमालाच ‘कलर प्रेझेंटेशन’ म्हटले जाते. या कार्यक्रमासाठी शुक्रवारी रात्रीच राष्ट्रपतींचे पुणेमार्गे नगरमध्ये आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींच्या हस्ते लष्कराच्या एखाद्या विभागाला ध्वजप्रदान करण्याचा क्षण हा अतिशय दुर्मिळ व गौरवाचा असतो. जो विभाग युद्ध व शांततेच्या काळात अतुलनीय निष्ठा व बहुमोल योगदान देत अतिशय मोलाची कामगिरी बजावतो त्यालाच हा गौरव प्रदान केला जातो.