पुणे । एसटीचे अधिकारी आणि कर्मचार्यांचा गणवेश बदलण्याची घोषणा होऊन दीड ते दोन वर्षांचा कालावधी उलटला असतानाही बहुतांशी अधिकारी आणि कर्मचार्यांना अद्याप नवा गणवेश मिळालेला नाही. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणार्या पुणे विभागातही नविन गणेवेशासाठी विलंब होताना दिसत आहे.
अंमलबजावणीस विलंब
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत महामंडळामध्ये नवनवीन बदल होत आहे. त्याशिवाय स्पर्धेच्या युगात खासगी बसेसना टक्कर देण्यासाठी शिवशाही, हिरकणी, शिवनेरी यासह अन्य आरामदायी बसेस आणल्या आहेत. त्या प्रवाशांच्या पसंतीसही उतरल्या आहेत. मात्र, महामंडळाच्या स्थापनेपासून अधिकारी, कर्मचार्यांचा खाकी गणवेश बदलण्याबाबत निर्णय झाला नव्हता कर्मचार्यांच्या वारंवार मागणीमुळे अखेर निर्णय झाला मात्र अंमलबजावणीस विलंब होत आहे.
पुणे विभागात 5-10% गणवेशवाटप
गेली अनेक वर्षे खाकी गणवेश बदलण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनां माध्यमातून करत होते. ही बाब लक्षात घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला. एका नामाकिंत संस्थेला काम देण्यात आले. त्यासाठी संबंधीत संस्थेला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर देखिल दोन महिन्यांची मुदत वाढवूनही देण्यात आली. मात्र आतापर्यंत केवळ 30 ते 35 टक्के कर्मचार्यांचे गणवेश तयार झाले आहेत. पुणे विभागात केवळ पाच ते दहा टक्के गणवेशाचे वाटप केले आहे. सर्व कर्मचार्यांना नवा कोरा गणवेश मिळण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
एसटी महामंडळाच्या पुणे विभागात 5 हजार 38 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची माहिती आणि गणवेशाची मापे वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आली आहेत. हे गणवेश लवकरात लवकर मिळावेत, यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पुणे विभागाच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार हे गणवेश लवकरात लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
– श्रीनिवास जोशी
विभाग नियत्रंक, एसटी महामंडळ, पुणे विभाग