एस.टी. कर्मचार्‍यांचा संप अटळ

0

अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे पगार कमी असल्याने कर्मचार्‍यांमध्ये नैराश्य आहे. सातवा वेतन आयोग पदनिहाय वेतनश्रेणीस लागू करून घेण्यासाठी संपाचा ठराव सांगलीच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून 26 व 27 मे रोजी महाराष्ट्रात लेखी स्वरूपात मतदान घेण्याचा निर्णय झालेला आहे.

स्वाभाविक अपेक्षा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा महाराष्ट्र राज्य सरकारचा अंगीकृत व्यवसाय आहे. यामध्ये काम करणारा कर्मचारी बहुसंख्येने चालक व वाहक या प्रवर्गातीलच आहे. आजच्या महागाईच्या काळात त्यांना तुटपुंज्या सात ते दहा हजार रुपयांमध्ये कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. मार्च 2016 मध्येच वेतन करार संपुष्टात आल्याने पुढील वेतनवाढ देताना सातवा वेतन आयोग पदनिहाय वेतनश्रेणीसह मिळावा, अशी अपेक्षा सर्व एस.टी. कर्मचार्यांची आहे.

कनिष्ठ वेतनश्रेणी अन्यायकारक
अन्यायकारक कनिष्ठ वेतनश्रेणी कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणीसुद्धा प्रलंबितच आहे. म्हणून संप व संपाआधी मतदान घेण्यासाठी 26 व 27 मे रोजी अकोलासह राज्यभर मतदान प्रक्रियेविषयीची माहिती देण्यासाठी अकोला विभागाच्या पदाधिकार्‍यांची बैठक रविवारी अकोला आगार क्रमांक 2 च्या हनुमान मंदिरात दुपारी झाल्याची माहिती संघटनेचे अविनाश जहागीरदार, कैलास नांदूरकर, दीपक वैष्णव, उदय गंगाखेडकर यांनी दिली.