एस.टी.चालकाला मारहाणीनंतर चक्काजाम

0

भुसावळ बसस्थानकाबाहेर कालीपिली चालकांची दबंगगिरी : दीड तास बसेस रोखल्याने प्रवाशांचे हाल

भुसावळ: भुसावळ बसस्थानकातून वराडसीमकडे निघालेल्या बसवरील चालकाला दुचाकी तसेच रीक्षातून आलेल्या जमावाने मारहाण केल्यानंतर संतप्त एस.टी.च्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता तब्बल दिड तास चक्का जाम केल्यानंतर बसस्थानकात वाहतुकीचा खोळंबा उडाला. या घटनेनंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी संतप्त कर्मचार्‍यांची समजूत काढली. एस.टी.चालकाच्या फिर्यादीनुसार मारहाण करणार्‍या दुचाकी चालकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपी हा कालिपिली वाहनावरही चालक असल्याची माहिती आहे. दरम्यान, बसस्थानकाबाहेर वाहतूक कर्मचारी नसल्याने अवैध वाहतुकीला ऊत आला असून कर्मचार्‍यांना सातत्याने दमदाटी करण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार एस.टी.कर्मचार्‍यांनी प्रसंगी केली.

दोन तास बसेस खोळंबल्या

बस चालकास मारहाण केल्यामुळे भुसावळ आगारासह बाहेरील आगारात सर्व एसटी बसेस बसस्थानक आवारात थांबविण्यात आल्या. परीणामी बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. जोपर्यंत संशयीत आरोपींना अटक केली जाणार नाही तोपर्यंत आगारातून कोणत्याही बसेस बाहेर न सोडण्याचा पवित्रा कर्मचार्‍यांनी घेतला. यावेळी यावल, रावेर, जळगाव, जामनेर, नाशिक, औरंगाबाद व अन्य 20 ते 25 बसेस आगारात दिड तास थांबून होत्या.

एस.टी.चालकाला मारहाण केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा

भुसावळ-वराडसीम बस (एम.एच.14 बी.टी.0442) वरील चालक राजेश लिलाधर पाटील (दत्त नगर, वांजोळा रोड, भुसावळ) यांना मारहाण केल्याप्रकरणी दुचाकीस्वार शेख अजीमोद्दीन शेख रीयोसोद्दीन (खडका, ग्रीनपार्क, भुसावळ) याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बस चालक पाटील यांच्या फिर्यादीनुसार ते गुरुवारी दुपारी दोन वाजता वराडसीम बस नेत असताना दुचाकी (एम.एच.19 ए.एस.7065) वरून आलेल्या शेख अजीमोद्दीन यांनी बसपुढे दुचाकी लावत बसच्या कॅबीनमध्ये चढून शिवीगाळ करीत उजव्या हातावर व पायावर मारहाण केली. यावेळी सहकारी शशीकांत निंभोरे, के.सी.कुठारे, आर.के.कुठारे, आर.के.पाटील, एस.एम.गजरे, बी.एस.पाटील यांनी वाद सोडवला. दरम्यान, बाजारपेठ पोलिसांनी शेख अजीमोद्दीन यास अटक केली असून तो कालीपिली वाहनावर चालक असल्याची माहिती आहे. जखमी चालकाला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदशनाखाली सुरू आहे.

बसचालकाला मारहाण

गुरुवारी बसस्थानकातून भुसावळ-वराडसीम बस (एम.एच.बी.टी.14-0442 ) बाहेर निघत असताना समोरून येणार्‍या रीक्षा चालकाने ब्रेक लावल्यानंतर त्यामागे दुचाकी (एम.एच.19 ए.एस.7065) वरील चालक धडकल्याने दोघाही वाहनावरील चालकाने बसचालक राजेश लिलाधर पाटील यांच्या कॅबीनमध्ये शिरून त्यांना बेदम मारहाण केली. बस चालकास मारहाण सुरू असताना रस्त्यावर शेकडोंच्या संख्येने जमाव जमला तर वाहतूक खोेळंबली. बस चालकास मारहाण केल्याची घटना घडताच एसटी कर्मचाऱी संघटनेच्या पदाधिकारी तसेच वाहक चालकांनी तत्काळ नजीकच झालेल्या घटनास्थळी धाव घेतली. कुठल्याही प्रकारची चूक नसतांना रीक्षा चालक व दुचाकीस्वारांनी एसटी कर्मचार्‍यास मारहाण केल्यामुळे तणाव निर्माण झाला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व बाजारपेठच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत शांतता राखण्याचे आवाहन करीत वाहतूक सुरळीत केली. आगारप्रमुख प्रमोद चौधरी तसेच एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुरेश चौधरी, डी.बी.करसाळे, डी.जे.कोळी यांनी बसचालकास घेऊन बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले. चालकास मारहाण करणार्‍या संशयित आरोपींना तात्काळ अटक करून संबंधितांवर गुन्हा नोद करावा, अशी भुमिका त्यांनी घेतल्यानंतर बसचालकाच्या फिर्यादीनुसार आरोपी शेख अजीमोद्दीन शेख रीयोसोद्दीन (खडका, ग्रीनपार्क, भुसावळ) याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटना घडली तेव्हा बसस्थानकात वेळेवर पोलिस कर्मचारी तैनात नव्हते, केवळ होमगार्डची ड्युटी तेथे लावण्यात आली असल्याचा संताप वाहक चालकांनी यावेळी व्यक्त केला. यापूर्वी देखील वेळोवेळी बस चालकांना किरकोळ कारणांवरून मारहाण केल्याचे प्रकार घडले आहे मात्र पोलिसांकडून आम्हाला सहकार्य मिळत नसल्याच्या भावना यावेळी कर्मचार्‍यांनी व्यक्त केल्या. एसटी कर्मचार्‍यास मारहाण केल्यामुळे बसस्थानकात पावणेदोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. या प्रकारामुळे ताटकळत बसलेल्या प्रवाशांना अखेर खासगी वाहनांतून प्रवास करावा लागला तर काही प्रवाशांनी रेल्वेने जाणे पसंत केले.