ऐकावे ते नवलच : तहसीलदार मिळावेत म्हणून सरणावर झोपून केले आंदोलन

Fasting by lying on the ground for the appointment of Bodwad Tehsildars बोदवड : बोदवड हे तालुक्याचे शहर असताना तहसीलदार मिळत नसल्याने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील येवती येथील रहिवासी प्रमोद धामोडे यांनी चक्क सरण रचून सोमवारी दुपारी 12 वाजेपासून आमरण उपोषणाला प्रारंभ केल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी मुक्ताईनगरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत असताना या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मात्र प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

मागणीला वाटाण्याच्या अक्षदा
प्रमोद धामोडे यांनी या आधी त्यांनी निवेदन देऊन ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसीलमध्ये कामासाठी यावे लागत असल्याने रीक्त पदावर तहसीलदारांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. पूर्णवेळ तहसीलदार नसल्यामुळे वृद्ध, अपंग व निराधार नागरीकांना तसेच पुरवठा शाखेमध्ये विविध कामांसाठी येणार्‍यांची प्रचंड गैरसोय होत होती. याबाबत बर्‍याच वेळा विविध पक्षामार्फत तसेच संघटनांमार्फत निवेदने देण्यात आली मात्र याबाबत वरीष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने सोमवारपासून बोदवड तहसीलबाहेर पूर्णवेळ तहसीलदारांची नियुक्ती होत नाही तो पर्यंत सरणावर झोपून आमरण उपोषणास कायम ठेवणार असल्याचा इशारा धामोडे यांनी दिला आहे.