ऐक्याची अगतिक हाक

0

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या भाजप विरोधकांच्या ऐक्याचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेस आला आहे. विशेष करून अलीकडेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आकस्मीकपणे भाजपची साथ धरल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थतेचे वारे पसरणे स्वाभाविक आहे. नितीश यांच्या या निर्णयाला त्यांच्या संयुक्त जनता दलातून फार मोठा विरोध होऊन पक्षाची शकले उडतील असा होरा मांडण्यात आला होता. मात्र असे झाले नाही. पक्षाचे राज्यसभेचे गटनेते शरद यादव व राज्यसभेचेच सदस्य अली अनवर यांच्यासह मोजक्या नेत्यांचा अपवाद वगळता कुणी याविरूध्द आवाज उठविला नाही. विशेषत: बिहार विधानसभेतील फक्त एका आमदारानेच विरोधी सूर लावल्याने नितीश सरकारला धोका नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ असा की, पुरेपूर तयारी करूनच नितीशकुमार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व गदारोळात त्यांचे राजकीय मार्गदर्शक तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी मात्र अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. यामुळे अर्थातच ते दिल्लीत भाजपविरोधी एकत्रीकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू बनले. या पार्श्‍वभूमिवर, त्यांनी नवी दिल्लीत गुरूवारी आयोजित केलेल्या ‘साझी विरासत बचाओ’ या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरूनच भाजपविरोधी हाक देण्यात आली.

वास्तविक पाहता अलीकडच्या काळात अनेकदा भाजपविरोधी ऐक्याच्या करण्यात आलेल्या घोषणा हवेतच विरल्याचे दिसून आले आहे. विशेष करून बिहारमध्ये महाआघाडीने विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर समाजवादी एकतेचे सुर आळवण्यात आले होते. मात्र एका बैठकीच्या पलीकडे याचे गाडे सरकले नाही. नंतर समाजवादी पक्षातील महाभारत व युपीत भाजपच्या जोरदार मुसंडीने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच बिहारमध्ये नितीशकुमारांनी धक्का दिल्यामुळे ‘समाजवादी ऐक्य’ हे मृगजळ असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. यामुळे एकतेचा हा प्रयोग समाजवादी विचारांच्या पलीकडे नेत थेट संघ व भाजपविरोधाला जोडण्यासाठी दिल्लीत विविध पक्षांचे नेते एकत्र आले. नावातच नमूद असल्यानुसार देशातील ऐक्याच्या विचाराला केंद्रस्थानी ठेवत भाजपविरोधी एकतेची वज्रमूठ उगारण्याचा संकल्प या कार्यक्रमात करण्यात आला. यामध्ये शरद यादव आणि त्यांच्या सहकार्‍यांसह काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, सपा, बसपा, राजद, भाकप, माकप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षांचे नेते सहभागी झाले. उपस्थितांमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश असल्यामुळे विरोधी पक्ष या कार्यक्रमात अतिशय गंभीरपणे सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. यात अपेक्षेप्रमाणे उपस्थित मान्यवरांनी संघ व भाजपवर सडकून टीका केली. संघाचा विचार हा देशात फूट पाडणारा असल्याचा बहुतांश वक्त्यांचा रोख होता. आणि या विचारधारेला रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे असा सूर सर्व नेत्यांनी लावला. तथापि, व्यासपीठावरून तावातावाने भाषण करणे आणि प्रत्यक्षातील अंमलबजावणीत जमीन-अस्मानचा फरक असल्याची बाब लक्षात घेता आपल्याला अनेक विसंगती दिसून येतात. याआधी 2004 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखविली होती. याला फळदेखील मिळाले होते. तथापि, त्यावेळी विरोधकांचे ऐक्य हे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाले होते. अर्थात काँग्रेस केंद्रस्थानी राहून अन्य पक्षांनी साथ दिल्यामुळे वाजपेयी सरकारचा पराभव करण्यात यश आले होते. मात्र आता 13 वर्षानंतर आता परिस्थिती इतकी बदलली आहे की, शरद यादव यांच्यासारख्या बंडखोर नेत्याच्या उपस्थितीत काँग्रेसला एकतेची हाक द्यावी लागली. राहूल गांधी यांनी संघावर जोरदार हल्लाबोल करत या विचाराला रोखण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. अन्य नेत्यांनीही भारताच्या गंगा-जमुनी तहजीबच्या ऐक्याचा संदर्भ देत भाजपच्या संकुचीत विचारावर जोरदार प्रहार केले. मात्र आज खुद्द काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट असून राहूल गांधी यांच्या संभाव्य नेतृत्वाला पक्षातून फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद नाही. याऐवजी 2019मध्ये प्रियंका गांधी यांना पुढे करावे असा पक्षात मतप्रवाह आहे. यामुळे खुद्द त्यांची अवस्था डळमळीत असतांना भाजपविरोध हा व्यासपीठावर बोलण्यास सोपा असला तरी प्रत्यक्षात उतारणे खूप कठीण आहे.

यासोबत उपस्थितांमध्ये अनेक परस्परविरोधी विचारांच्या नेत्यांचा समावेश असल्याने त्यांचे ऐक्य होणे फारसे सोपे नाही. म्हणजे पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल आणि डावे तर उत्तरप्रदेशात समाजवादी आणि बसपाने एकत्र येण्याची बाब किती अवघड आहे हे सांगणे नकोच. तर दुसरीकडे बिजू जनता दल, द्रमुक, अद्रमुक, टिआरएस आदींसारख्या प्रादेशिक पक्षांनी या बैठकीपासून दोन हात अंतर राखले. तर प्रस्थापितांच्या विरोधात असणारे अरविंद केजरीवालदेखील विरोधकांच्या या संभाव्य महाआघाडीत येणार तरी कसे? या प्रश्‍नाचेही उत्तर सोपे नाही. ‘साझी विरासत बचाओ’च्या व्यासपीठावरून भाजपविरोधाची हाक दिली जात असतांना दुसरीकडे अमित शहा यांनी आपल्या मोजक्या मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत ‘मिशन 350 प्लस’ची आखणी करण्यात मग्न असल्याची बाबदेखील लक्षणीय आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार जिथे दुसर्‍या क्रमांकावर होते अशा 150 जागांवर जिंकण्यासाठी या बैठकीत रणनिती आखण्यात आली. अर्थात एकीकडे भाजप अत्यंत आत्मविश्‍वासाने आगामी निवडणुकीची रणनिती आखत असतांना विरोधकांना मात्र एकत्रीत लढ्याची आवश्यकता भासत असल्याची बाब अत्यंत दोन्ही बाजूंच्या मनोदशेची विसंगती दर्शविणारी आहे.