ऐतिहासिक उच्चांक : सेन्सेक्सची ८७२ तर निफ्टीची २५४ अंकांची उसळी

मुंबई : महाराष्ट्रातील करोनासंदर्भातले निर्बंध शिथिल केल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. मंगळवारी गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी पातळी गाठली. निफ्टीने पहिल्यांदाच १६००० अंकांची पातळी ओलांडली. सेन्सेक्स ८७२ अंकानी उसळून ५३,८२३ अंकांवर बंद झाला तर निफ्टी २४५ अंकांनी उसळून १६,१३० अंकांवर बंद झाला. बँका, फार्मा क्षेत्रात झालेल्या जोरदार खरेदी झाली. या तेजीने गुंतवणूकदारांची मालमत्ता दोन लाख कोटींनी वाढली आहे.

मंगळवारी बाजार सुरु होताच गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला. आशियातील इतर बाजारांमधील सकारात्मक संकेतांनी गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला. त्यांनी चौफेर खरेदी सुरु केली. सेन्सेक्स मंचावर ३० पैकी २३ शेअर तेजीत होते. ज्यात एशियन पेंट, एचडीएफसी, पॉवरग्रीड, टायटन, टेक महिंद्रा, मारुती, एचयूएल, ऍक्सिस बँक, एसबीआय, डॉ. रेड्डी लॅब, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह या शेअरमध्ये वाढ झाली. रिलायन्स, भारती एअरटेल, एनटीपीसी, टाटा स्टील, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक हे शेअर घसरले.जुलैमधील वाहन विक्रीच्या आकडेवारीचा सलग दुसर्‍या दिवशी प्रभाव दिसून आला. आज बाजारात टाटा मोटर्स, अशोक लेलँड, एस्कॉर्टस, मारुती सुझुकी या शेअरमध्ये वाढ झाली. तर हिंदुस्थान कॉपर, हिंदुस्थान झिंक, जिंदाल सॉ, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील या शेअरमध्ये घसरण झाली.

पीएमआय इंडेस्कमध्ये वाढीचे सकारत्मक परिणाम

आयटी आणि कन्झ्युमर स्टॉक्समध्ये घसघशीत वाढ होण्यामध्ये सकारात्मक आर्थिक निर्देशकांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोविड-१९चे निर्बंध देशपातळीवर काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे जुलै २०२१मध्ये भारतातील कारखान्यांमधील कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. परिणामी उत्पादन क्षेत्रात भरघोस वाढ होऊ लागली आहे. या कारणामुळे अधिकाधिक उद्योग पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. त्याचा देखील परिणाम बाजारपेठेमध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण होण्यात झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. याआधी सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स ३६४ अंकांनी वधारला होता. तर निफ्टीत १२२ अंकांची वाढ झाली होती. देशातील औद्योगिक उत्पादनाचे निर्देशांक असलेल्या पीएमआय इंडेस्कमध्ये जुलै महिन्यात वाढ झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सावरत असल्याचे संकेत मिळत आहेत, असे जाणकारांनी सांगितले.