‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करून भारतीयांमधील स्वराज्यप्राप्तीची चेतना जागृत करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आदर्श सरकारने युवा पिढीपुढे ठेवायला हवा. त्यासाठी त्यांच्या आठवणींचे जतन आणि संवर्धन करायचे हवे; मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरी येथील जन्मस्थानाची दुरवस्था झाली आहे. या अमूल्य ठेव्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सरकारने लोकमान्य टिळक यांच्या या जन्मघराची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन्. पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबर या दिवशी समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. बी. एन्. पाटील यांची भेट घेऊन याविषयीचे सविस्तर निवेदन सादर केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. देवेंद्र झापडेकर, टिळकप्रेमी श्री. शरदचंद्र रानडे, श्री शिवचरित्र कथाकार श्री. बारस्कर आणि सनातन संस्थेचे श्री. रमण पाध्ये उपस्थित होते.
लोकमान्यांच्या या जन्मस्थानाच्या छप्पराची कौले फुटली आहेत, भिंतींवर शेवाळे धरले आहे. काही ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत. पुरातत्त्व खात्याने जन्मस्थानाच्या प्रवेशद्वाराबाहेर लावलेला फलक गंजल्याने तो नीट वाचताही येत नाही. लोकमान्य टिळकांचा पुतळा आणि मेघडंबरीची दुरवस्था झाली असून पुतळ्याचा रंग काही ठिकाणी उडाला आहे. स्मारकाच्या छप्परावरील कौलांवर गवत वाढले आहे. वेळीच लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यात पाणी गळून या वास्तूत जतन केलेला अनमोल ठेवा खराब होण्याचे भय आहे. लोकमान्याच्या पुतळ्यावरील मेघडंबरीच्या खाबांना लावलेल्या फरशांमध्ये भेगा पडल्या असून छताचा रंग उडाला आहे. मेघडंबरीच्या मागे लोकमान्य टिळकांची शिल्पाकृती तुटलेल्या स्थितीत आहे. स्मारकाला भेट द्यायला देशभरातून शेकडो पर्यटक, शाळांच्या सहली येत असतात. त्यांना देण्यासाठी येथे माहिती पुस्तिकाही नाही. पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, ‘सीसीटिव्ही’ नाही, वाहनतळाची (पार्किंगची) व्यवस्था नाही, अशा अनेक गोष्टींचा इथे अभाव आहे. पर्यटकांना ते मोडलेले-तुटलेले आणि भग्नावस्थेतील जन्मस्थान पहावे लागत आहे. स्वातंत्र्यसमरातील या थोर नेत्याच्या जन्मस्थानाची सरकारने त्वरित डागडुजी करावी, अशी समस्त राष्ट्रपेमींची मागणी आहे.
माहिती अधिकाराखाली या स्मारकाची राज्य अथवा केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने पहाणी केली आहे का, असे विचारले असता पहाणी केली नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. यावरून सरकारची स्मारकाप्रतीची अनास्था दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचे त्वरित संरक्षण आणि संवर्धन करण्यात यावे. तसेच ते ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे. येथे लोकमान्य टिळकांचा जीवनपट दाखवण्याची व्यवस्था करावी. जन्मस्थानाची माहिती पुस्तिका आणि लोकमान्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या प्रती, लोकमान्य टिळकांची दुर्मिळ छायाचित्रे इत्यादी साहित्य येथे ठेवण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.