पुणे । ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर आणि विचार करण्याजोगी बाब आहे. आपण आजवर आपला वारसा असलेल्या इतक्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे की त्यातील अनेक वस्तू चोरल्या गेल्या किंवा इतर देशांमध्ये पळवून नेल्या गेल्या. ऐतिहासिक वारसा हा त्या काळातील संस्कृतीचे चित्र उभे करत असून त्याबद्दल समाजात जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ मूर्तिशास्त्र तज्ज्ञ व डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
‘आर्ट टू डे’ गॅलरी आणि ‘हेरीटेज इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या संस्कृतीचा प्रवास जाणून घेण्यासाठी ‘द यात्रा- नो युवर रूट्स’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास डॉ. देगलूरकर यांच्या व्याख्यानाने सुरूवात करण्यात आली. ‘आर्ट टू डे’ गॅलरीच्या प्रियंवदा पवार, ‘हेरीटेज इंडिया’च्या मंजिरी खांडेकर या वेळी उपस्थित होत्या.
‘द यात्रा- नो युवर रूट्स’ या उपक्रमातील पुढील व्याख्यान 8 फेब्रुवारी रोजी भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे गॅलरी येथे आयोजित करण्यात आले असून आनंद कानिटकर या व्याख्यानात ’रॉक कट केव्हज’ या विषयावर माहिती देणार आहेत.
’भारतीय तत्ववेत्त्यांनी मूर्तीकलेच्या माध्यमातून तत्वज्ञानाला व्यक्तीरूप प्राप्त करून दिले. हे केवळ भारतीय कलाकारांनी केलेले आढळते. आपल्या मूर्तींचे हे सौंदर्य आहे,’ असे डॉ. देगलूरकर यांनी सांगितले. वारशाविषयी माहितीच नसल्यामुळे किंवा त्याची पर्वा न केल्यामुळे ऐतिहासिक वारशाच्या अनेक वस्तू ठिकठिकाणहून कशा चोरीस गेल्या किंवा त्यांचे काहीच अवशेष कसे वाचवता आले. प्रसंगी भारतीयांनी केलेल्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर परकीयांनी या वस्तूंविषयी आस्था दाखवली, याची अनेक उदाहरणे देगलूरकर यांनी दिली. ते म्हणाले, ’ऐतिहासिक वारसा प्राचीन काळाचे प्रतिबिंब दाखवतो. तेव्हाच्या लोकांचे विचार, वागण्याच्या पद्धती, परंपरा याचा अंदाज बांधता येतो. वारशाविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे.’
आपली संस्कृती प्राचीन
भारतीय संस्कृतीविषयी बोलताना डॉ. देगलूरकर म्हणाले, ’भारताप्रमाणेच इजिप्त, इराक, ग्रीस, बॅबिलोनिया अशा अनेक ठिकाणच्या संस्कृती प्राचीन आहेत. परंतु इजिप्शियन संस्कृतीतील आता काय उरले याचे उत्तर केवळ पिरॅमिडस् किंवा ममी अशा वस्तूंच्या स्वरूपात आहे. इजिप्शियन लोक तेव्हा जसे होते ती संस्कृती परकीय आक्रमणांपुढे टिकू शकली. भारतीय संस्कृती मात्र प्रवाही स्वरूपात आणि नवीन गोष्टींना सामावून घेत टिकून राहिली. त्यामुळे आपली संस्कृती सर्वांत प्राचीन असून आपल्याला त्याचा अभिमान असायला हवा.’