ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन होणे गरजेचे

0

डॉ. राजा दिक्षित : गडसंवर्धन व स्वच्छता अभियान शिबिर

नारायणगाव । इतिहास घडविला गेला पण त्या इतिहासातील अजरामर विचारांची जपवणूक करावयाची असेल तर ऐतिहासिक स्थळांची जपवणूक व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असे मत इतिहास तज्ज्ञ डॉ. राजा दिक्षित यांनी मांडले. सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ राष्ट्रीय सेवा योजना व नारायणगावातील ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय गडसंवर्धन व स्वच्छता अभियान शिबिर राबविण्यात येत आहे. 25 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या शिबिराचा शनिवारी समारोप होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन डॉ. दिक्षित यांच्या हस्ते झाले. इतिहास आणि गडसंवर्धन या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाशशेठ पाटे, कार्याध्यक्ष कृषीभूषण अनिलतात्या मेहेर, रविद्रं पारगावकर, डॉ. आनंद कुलकर्णी, श्रीकांत शेवाळे, जगन्नाथ कवडे, गोविंद कवडे याप्रसंगी उपस्थित होते.

आदर्श व्यक्तिंचे विचार जोपासा
जुन्नर तालुक्यात असलेल्या शिवनेरी, चावंड, हडसर, जीवनधन, नारायणगड यासारख्या अनेक गडकिल्ल्यांवरील वारसा असलेल्या ऐतिहासिक वास्तुंचे तसेच वनस्पतींचे जतन करण्यासाठी गडसंवर्धन शिबिर यशस्वीपणे राबविणे आवश्यक आहे. यासाठी दुर्गप्रेमी संघटना, दुर्गसंवर्धक यांच्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक देखील हे कार्य मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे पुढे नेऊ शकतात. त्यासाठी इतिहासात होऊन गेलेल्या आदर्श व्यक्तिंचे विचार जोपासले पाहिजेत. नारायणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक पुढील काळात हे प्रभावी कार्य करू शकतील, असे मत ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृृषिभूषण अनिलतात्या मेहेर यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.

मार्गदर्शिकेचे प्रकाशन
गडसंवर्धन शिबीराच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत डॉ. लहू गायकवाड व डॉ. श्रीकांत फुलसुदंर लिखित ’जुन्नर तालुका पर्यटन मार्गदर्शिका’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील 200 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या शिबिराचे आयोजन व संयोजन प्राचार्य श्रीकांत शेवाळे, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुदंर, प्रा. स्वप्निल कांबळे, प्रा. शाकुराव कोरडे, विदयार्थी प्रतिनिधी सागर कसबे, पुजा मानव, अक्षय परदेशी, पराग गावडे यांनी केले.