जळगाव। रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील मद्य विक्री दुकाने सुरेशचंद्र जैस्वाल, योगेश चौधरी, हॉटेल रंगोली व निलेश एस.जैस्वाल, हॉटेल महेंद्र यांची व या व्यतिरिक्त जी काही मद्य विक्री परवाने मंजूर असतील ती सर्व परवाने तात्काळ प्रभावाने कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज निर्गमित केले आहे. मौजे ऐनपूर येथे दारुबंदी करण्यासंदर्भात मातोश्री रमाबाई बहुउद्देशिय संस्था, ऐनपूर आणि महिलांनी 29 एप्रिल, 2017 नुसार ऐनपूर येथील दारुबंदीसाठी निवेदन सादर केले होते. याबाबत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ यांनी सह्याची पडताळणी करुन अहवाल रावेर तहसिलदार यांना सादर केला होता.
दारूबंदीसाठी झाली निवडणूक
रावेर तहसिलदार यांनी दारुबंदी संदर्भात मतदान प्रक्रिया राबवून एकूण 2615 महिला मतदारांपैकी 1555 महिला मतदारांनी मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद करण्यासाठी मतदान केले होते. एकूण 59 टक्के महिला मतदारांनी दारुबंदीच्या बाजूने मतदान केले होते. हे मतदान 50 टक्के पेक्षा जास्त असल्याने गृहविभागाच्या दारुबंदी कायद्याच्या तरतुदीनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या अनुज्ञप्ती धारकांना ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती जिल्ह्यात इतरत्र स्थालांतरीत करण्याची मुभा राहील असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.