ऐनपूर शिवारात मक्याच्या शेताला शार्टसर्किटमुळे आग

0

खिर्डी । येथून जवळच असलेल्या ऐनपूर शिवारात असलेल्या शेतात रोहीत्राच्या शार्ट सर्किटमुळे एक एकरावरील मक्याच्या शेताला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवार 2 रोजी घडली. खिर्डी बुद्रूक येथील शेतकरी घनश्याम राजाराम पाटील यांनी विजय हरी पाटील यांचे ऐनपुर शिवारातील गट नं.614 शेत नफ्याने केले असुन शेतातील रोहित्रात शार्ट सर्किट झाल्याने शेतात काढून पडलेल्या मक्याला आग लागली असता एक एकर मका जळून खाक होवून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी घनश्याम पाटील यांनी सांगितले.

अग्निशमन बंबाचे पाचारण
यावेळी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील व काही शेतकर्‍यांनी शेतात धाव घेतली व आग आटोक्यात आणली गावातुन पाण्याचे टँकर आणण्यात आले तसेच रावेर येथून अग्नीशमक दलासही पाचारण करण्यात आले होते. परिसरातील शेतकर्‍यांच्या अथक प्रयत्नांतर आग विझविण्यात आली. मात्र यात शेतातील संपुर्ण मका जळून खाक झाला आहे. त्यामुळे शासनाकडून पंचनामा व्हावा व योग्य ती मदत शेतकर्‍याला मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.