जळगाव । औद्योगिक वसाहतीमध्ये इ-सेक्टरमधील सुदर्शन इलाइट इंडस्ट्रीज समोर शनिवारी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास कारखान्यांना विद्युत पुरवठा सुरू असताना थेट डीपीलाच नळी लावून ट्रान्सफॉर्मर मधून तीनशे लिटर ऑईल चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दुसर्या संशयितालाही आज मंगळवारी अटक केली. दरम्यान, त्यास मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 1 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दोघांना आज न्यायालयात हजर करणार
एमआयडीसीतील सुदर्शन इलाइट इंडस्ट्रीज समोर शनिवारी रात्री 2.30 वाजेच्या महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरजवळ ट्रक लावून ऑईलची चोरी सुरु होती. त्यावेळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने कामगाराने बाहेर येऊन बघितल्यावर ऑइल चोरी सुरू होती. त्याने पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर येऊन ट्रकचा क्लिनर जगदीश प्रसाद देवीप्रसाद (वय 35,रा. रामगंज, राजस्थान) याला ताब्यात घेतले होते. महावितरण कंपनीचे अधिकारी प्रमोद रामदास तायडे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रक चालक, क्लिनर यांच्या विरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी जगदीश प्रसाद याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर आज मंगळवारी एमआयडीसी पोलीसांनी ऑईल चोरीतील दुसरा संययित हिरालाल प्रकाशचंद मेघवाल (रा. मोडक, शिवनगर ता. रामगंजमंडी जि. कोटा. राजस्थान) याला अटक केली. दुपारी त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला न्या. गोरे यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, दुसर्या संशयिताच्य शोधार्थ पोलीस राजस्थान येथे जाणार होते. त्यामुळे जगदीश देविलाल प्रसाद याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, दुसरा संशयित पोलीसांना मिळून आल्याने आता बुधवारी ऑईल चोरीतील दोघा संशयितांना एकत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.