नवी दिल्ली । दिल्लीच्या सीपी म्हणजेच कनॉट प्लेस भागातील रस्त्यांवर तुम्हाला एक व्यक्ती दिसेल. मुलांनी स्वत:पासून दूर केलेल्या या व्यक्तीची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 76 वर्षीय राजा सिंह फुल यांचे काही फोटो आणि त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी माहिती होताच त्यांच्या मदतीसाठी दिल्लीतीलच एक शीख तरुणांचा गट धावून आला आणि त्यांनी राजा सिंह यांना राहण्यासाठी आसरा दिला. ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले राजा सिंह साठच्या दशकात त्यांच्या भावाच्या सांगण्यावरून भारतात आले होते.
व्हीसा सेंटर बाहेर फॉर्म भरून देतात
काळाने त्यांच्यासाठी पुढे बर्याच अडचणी वाढून ठेवल्या होत्या. सध्या ते दिल्लीच्या शिवाजी स्टेडियम शेजारी असणार्या व्हिसा सेंटरबाहेर तिथे येणार्या लोकांना व्हिसाचे फॉर्म भरून देण्यासाठी मदत करतात. यासाठी ते कधीकधी पैसेही आकारत नाहीत. पण, अनेकजण त्यांना स्वखुशीने मदत करतात. वाढते वय आणि ढासळणारी प्रकृती अशी अवस्था असतानाही त्यांना स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी हे काम करावे लागत आहे. सोशल मीडियामुळे हजारो अनोळखी चेहर्यांनी त्यांना आपलेसे करत मदतीसाठी हात पुढे केलाय.
कधीही हात पसरला नाही
परिस्थितीने आपल्यापुढे इतक्या अडचणी उभ्या केलेल्या असल्या तरीही राजा सिंग यांनी इतरांपुढे याचना करण्यासाठी कधीच हात पसरलेले नाहीत. कित्येकदा तर त्यांच्या वाट्याला पोटभर अन्नही आले नाही. पण, आयुष्याकडे पाहण्याची त्यांची सकारात्मक वृत्ती मात्र तसूभरही कमी झालेली नाही. आजही ते बोलू लागल्यावर त्यांच्या इंग्रजीमध्ये असणारी परदेशी लय आणि भाषेमध्ये असणारा गोडवा अनेकांनाच थक्क करून जातो.
मुलांनीही फिरवली पाठ
अविनाश सिंग या युझरच्या फेसबुक पोस्टमुळे राजा सिंग यांच्याविषयीची माहिती सर्वांनाच मिळू शकली. कुटुंबाच्या नावावरही राजा सिंग यांच्या वाट्याला निराशा आली. ज्या मुलांनी उतारवयात त्यांचा सांभाळ करणे अपेक्षित होते तीच मुलं आज परदेशात आपल्या कुटुंबांसह आरामदायी आयुष्य जगत आहेत. ज्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी वडिलांनी अथक परिश्रम केले त्याच मुलांनी आज त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.