ऑगष्ट महिन्यातही भुसावळ तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरूच

0

पिके तरारली मात्र भुगर्भातील पाण्याची पातळी तहानलेलीच : दमदार पावसाची अपेक्षा

भुसावळ- आठ दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे शेती पिके तरारली असली तरी भुगर्भातील पाण्याची पातळी तहानलेलीच असल्याने तालुक्यातील 12 गावांमध्ये विहिर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरववठा सुरूच असून अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

12 गावांमध्ये टंचाईच्या झळा
शासनाच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण होणार्‍या गावांमधील पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये टँकरने पाणीपुरवठा, तातडीची पाणीपुरवठा योजना, विहिर अधिग्रहण करून गावातील पाण्याची समस्या मार्गी लावली जाते. यंदा तालुक्यातील 12 गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने प्रशासनाच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून प्रशासनाच्या माध्यमातून केला जाणारा पाणीपुरवठा जुन महिन्याच्या अखेरीस बंद केला जातो मात्र यंदा ऑगष्ट महिना अखेरपर्यंत पोहोचूनही तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे भुगर्भातील जलपातळीत वाढ झाली नसल्याने प्रशासनाच्या माध्यमातून पाणीटंचाईच्या गावांमध्ये टँकरने व विहिर अधिग्रहणाने पाणीपुरवठा सुरूच आहे.

पिके तरारली मात्र भुगर्भ तहानलेलाच
ऑगष्ट महिन्यातही पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले होते मात्र 16 ऑगष्टपासून सलग चार दिवस पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले असले तरी भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली नसल्याने भुगर्भ तहानलेलाच असल्याने सर्वांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

अशी आहेत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे
प्रशासनाने नियमानुसार 30 जूनला पाण्याचे टँकर व अधिग्रहीत केलेल्या विहिरीवरून पाणीपुरवठा बंद केला होता मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जुलै अखेरपर्यंत पाणीपुरवठ्याला वाढीव मुदत देण्यात आली होती मात्र यानंतरही दमदार पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील महादेव माळ, कंडारी परीसर या दोन गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून गोंभी आणि मोंढाळा या दोन गावातील टँकर बंद करण्यात आले आहे तर शिंदी, टहाकळी, खेडी, चोरवड, किन्ही, काहुरखेडा, कन्हाळे खुर्द व खंडाळे या गावांमध्ये विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरूच ठेवण्यात आला आहे.

शासनाचा दरवर्षी होतो लाखो रुपयांचा खर्च
पाणीटंचाईच्या काळात शासनाच्या माध्यमातून पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावात टँकरने अथवा विहिर अधिग्रहण करून पाण्याची समस्या मार्गी लावून नागरीकांना दिलासा दिला जातो मात्र यावर शासनाचे दरवर्षी लाखो रूपये खर्च होतात. यासाठी शासनाने सतत टंचाईग्रस्त होत असलेल्या गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे.

प्रशासनाकडून घेतला जात आहे आढावा
तालुक्यातील भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नसल्याने प्रशासनाच्या माध्यमातून अद्यापही पाणीपुरवठा सुरूच आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावातील पाण्याची काय स्थिती आहे याचा प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे. यामध्ये ज्या गावातील पाण्याची परीस्थिती समाधानकारक असेल अशा गावात टँकरने अथवा विहिर अधिग्रहणाने होणारा पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याचे शाखा अभियंता एस.पी.लोखंडे यांनी सांगितले.