मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळण्यात होणारा विलंब तातडीने दूर करण्यासाठी महा डीबीटी पोर्टल येत्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात येत असून 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून स्कॉलरशिपची रक्कम मिळण्यात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात प्रा. अनिल सोले, नागो गाणार, मितेश भांगडीया, गिरीशचंद्र व्यास आदींनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बडोले बोलत होते.
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, परभणी व भंडारा जिल्ह्यातील समाज कल्याण विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी दाखल केलेल्या तीन लाख सत्तावन्न हजार आठशे पासष्ट विद्यार्थ्यांपैकी एक लाख 26 हजार विद्यार्थी वंचित असल्याचा मुद्दा प्रा. अनिल सोले यांनी सभागृहाच्या निदर्शानास आणला. त्यावरील उत्तरात बडोले म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील बंद पडलेल्या शैक्षणिक संस्थांनी शिष्यवृत्ती योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनेचे अभिलेख विशेष चौकशी पथकास उपलब्ध करून दिलेले नाही, त्यामुळे विलंब झालेला आहे. सदर अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांनी संबंधित संस्थांना कळवले असल्याचे बडोले यांना सांगितले.
शैक्षणिक शुल्क समितीकडून विद्यालयांचे शुल्क उशिरा ठरविण्यात येत असल्यामुळे शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू होण्यात उशीर होत होता, मात्र यावर्षी एप्रिल महिन्यातच शैक्षणिक शुल्क समितीने शुल्क निश्चित केल्यामुळे तसेच शासन महा डीबीटी पोर्टल सुरू करणार असल्यामुळे या वर्षापासून शिष्यवृत्ती प्रक्रियेत सुटसुटीतपणा येईल, असेही बडोले यांनी सांगितले.
2014-15 मध्ये बंद पडलेल्या एकून 28 संस्थांपैकी २५ संस्थांनी अभिलेख सादर केले. अभिलेख सादर न करणाऱ्या उर्वरित तीन संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. जोगेंद्र कवाडे, निरंजन डावखरे, प्रकाश गजभिये तसेच हरिभाऊ राठोड आदींनी उपप्रश्न विचारले.