नवी दिल्ली- ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात दलाली दिल्याचा आरोप असलेला ब्रिटिश नागरिक ख्रिश्चियन मिशेलच्या अटकेनंतर एक चिठ्ठी सापडली आहे. ही चिठ्ठी फिनमेकॅनिका कंपनीचे सीईओ जुसेपी ओरसी यांना लिहिण्यात आली आहे. चिठ्ठीत सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाचा तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्यावर दबाव होता. तसेच मिशेलला या कराराची सर्व माहिती संबंधित मंत्रालयाकडून मिळत होती असे लिहिण्यात आले होते.
२८ ऑगस्ट २००९ रोजी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार, मिशेलला ऑगस्टा वेस्टलँडसंबंधित सर्व माहिती पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालयासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत होती. इतकेच नव्हे, तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या भेटीसंदर्भातही त्याला माहिती होती.
या करारासंदर्भात कॅबिनेटची जी बैठक होणार आहे. त्यासंदर्भात मला माहीत आहे. या प्रकरणात पंतप्रधान, जॉइंट सेक्रेटरी आणि डिफेन्स सेक्रेटरीदरम्यान जी चर्चा सुरू होती, तीसुद्धा मिशेलला माहिती होती. तसेच तत्कालीन संरक्षण मंत्री या कराराच्या बाजूने असल्याचेही त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.
ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात अटकेत असलेला ब्रिटीश नागरिक क्रिश्चियन मिशेल याचे ४ डिसेंबर रोजी भारताला प्रत्यार्पण करण्यात आले होतो. ३६०० कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात तो भारतातील तपास संस्थांना हवा होता. मागील महिन्यात न्यायालयाने मिशेलच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिली होती. प्रत्यार्पणाची ही प्रक्रिया इंटरपोल आणि सीआयडीच्या समन्वयाने झाली.