ऑगस्टा वेस्टलँड घोटाळयाप्रकरणी मध्यस्थीला अटक !

0

नवी दिल्ली- व्हीव्हीआयपी ऑगस्टा हेलिकॉप्टर व्यवहाराप्रकरणी दिल्लीतील सुशेन मोहन गुप्ता या मध्यस्थीला अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय (इडी)ने ही कारवाई केली आहे. ३६०० कोटी रूपयांच्या गैरव्यवहारात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्‍टनुसार (पीएमएलए) त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. गुप्ताकडे व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीसंबंधीची काही माहिती असल्याचा इडीला संशय आहे. त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गुप्ताचा ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारासह अनेक संरक्षण व्यवहारात सहभाग होता, अशी माहिती इडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. पीएमएलए न्यायालयात त्याला हजर केले जाणार आहे.

इडीने यापूर्वीच वकील गौतम खेतान आणि ब्रिटिश नागरिक ख्रिश्चियन मिशेलला अटक केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणी सरकारी साक्षीदार बनलेल्या राजीव सक्सेनाच्या खुलाशाच्या आधारे गुप्ताची या व्यवहारातील भूमिका समोर आली. सक्सेनाला संयुक्त अरब अमिरातीतून प्रत्यार्पित करण्यात आले होते.

१ जानेवारी २०१४ रोजी सरकारने १२ एडब्ल्यू १०१ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीचा ब्रिटनमधील फिनमॅकेनिका कंपनीच्या ऑगस्टा वेस्टलँडबरोबरील व्यवहार रद्द केला होता. अटींचे उल्लंघन करणे आणि व्यवहार होण्यासाठी ४२३ रूपयांची लाच दिल्याचा आरोप करत भारताने हा व्यवहार रद्द केला होता.