ऑडिशनला आलेल्या तरुणीचा दिग्दर्शकाकडून विनयभंग

0

वाकड : चित्रपटात काम मिळावे, या अपेक्षेने ऑडिशनसाठी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा दिग्दर्शकाने विनयभंग केला. ही धक्कादायक घटना काळेवाडीत सहा ऑगस्टला घडली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग करणार्‍या दिग्दर्शकाविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पा पवार असे संशयित आरोपी असलेल्या दिग्दर्शकाचे नाव आहे. त्याला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाकड पोलीस या प्रकरणाचा प्राथमिक तपास करत आहेत.

पुण्यात शिकते तरुणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही पुण्यात शिक्षणासाठी आलेली आहे. तिला व्हॉट्सअ‍ॅपवरून काळेवाडी, तापकीर चौक याठिकाणी चित्रपटाची ऑडिशन असल्याची माहिती मिळाली होती. चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याने तिने ऑडिशनबाबत संपर्क साधला होता. तिने ऑडिशनसाठी संपर्क साधला त्यावेळी तिला, आजची ऑडिशन रद्द झाली असून, तू उद्या ये, असा एसएमएस पाठवण्यात आला होता.

शारीरिक संबंधाची मागणी
त्यानुसार ती तरुणी सहा ऑगस्ट रोजी ऑडिशनसाठी आली. तेव्हा दिग्दर्शक असलेल्या अप्पा पवार याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच त्याने इतर चित्रपटात काम देतो, असेही आमिष तिला दाखवले. या प्रकारानंतर संबंधित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अप्पा पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.