पुणे : मतदार यादीत ऑनलाइनपद्धतीने अर्ज करून नाव नोंदविता येणार असून, नागरिकांनी येत्या महिना अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले आहे. महिन्याच्या दर रविवारी मतदान केंद्रात, तर मंगळवारी महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. याशिवाय गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित करण्यात आले आहे. नागरिकांना एनव्हीएसपी डॉट इन या संकेतस्थळावर मतदार नोंदणीचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे दाखल करता येतील. तसेच विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज आणि कागदपत्रे भरून नाव नोंदणी, पत्ता बदल, नावातील दुरुस्ती वा बदल करून घेता येणार आहे. या महिना अखेरीपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे.