पुणे-महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची ऑनलाइन वीजबिल भरणा सेवा आज अचानक बंद झाली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा सध्या बंद झाली असल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. लवकरच ही सेवा पूर्ववत होईल असे सांगण्यात आले असले तरी नेमकी कधी ही सेवा पूर्ववत होईल याबाबत संकेतस्थळावर माहिती देण्यात आलेली नाही. परिणामी, विज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची इंटरनेटद्वारे चालणारी वीज देयक भरणा सुविधा बंद आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच हा प्रकार घडल्याने अनेक ग्राहकांची गैरसोय झाली आहे. त्यांना रांगेत उभे राहून देयक भरावे लागत आहे. त्यामुळे वीज देयक भरणा केंद्रांवर रांगा लागल्या आहेत.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची इंटरनेट सुविधा दोन दिवस बंद होती. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन वीज देयक भरणे अशक्य झाले होते आणि देयक संकलन केंद्रात ग्राहकांनी गर्दी केली होती.